मानवत: तालुक्यातील सोमठाणा येथे ग्रामपंचायतिकडून पाणी पुरवठा सुरळीत होत नसल्याने संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी ग्रामसेवकाला धारेवर धरले. संतप्त ग्रामस्थांनी ग्रामपंचायत कार्यालयात ग्रामसेवकाला कोंडून घेतले. 15 ऑगस्ट रोजी सकाळी 11 वाजेच्या सुमारास हे आंदोलन झाले.
मानवत तालुक्यातील सोमठाणा येथे मागील काही दिवसापासून ग्रामपंचायत कार्यालयाकडून सुरळीत पाणीपुरवठा होत नसल्याने ग्रामस्थ त्रस्त आहेत. पाणी मिळत नसल्याने ग्रामस्थांना अनंत अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. तसेच पाणीपुरवठा का होत नाही असा जाब पाणीपुरवठा सेवकाला विचारल्यास तो समाधानकारक उत्तर देत नसल्याचा आरोपही गावकऱ्यांनी केला.
या सर्व प्रकाराबाबत अनेकदा ग्रामपंचायत कार्यालयाकडे तक्रारी करूनही दखल घेतली जात नाही. यामुळे संतप्त झालेल्या शेकडो गावकऱ्यांनी ग्रामपंचायत कार्यालयात ग्रामसेवक आर. एल. मुळे यांच्यासमोर मांडला. मात्र, ठोस आश्वासन मिळत नसल्याने संतप्त गावकऱ्यांनी ग्रामसेवक मुळे यांना ग्रामपंचायत कार्यालयात कोंडले. यानंतर ग्रामसेवक मुळे यांनी सात दिवसात संपूर्ण गावात पाणीपुरवठा सुरळीत करण्यात येईल व पाणीपुरवठा सेवक तुकाराम निर्वळ यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात येईल असे लेखी आश्वासन दिल्यानंतर गावकऱ्यांनी त्यांची सुटका केली.
सात दिवसात पाणी पुरवठा सुरळीत न झाल्यास राष्ट्रीय महामार्ग 61 वर रस्तारोको आंदोलन करण्याचा इशारा गावकऱ्यांनी दिला आहे. यासंदर्भात देण्यात आलेल्या निवेदनावर सतीश निर्वळ, पांडुरंग निर्वळ, बळीराम निर्वळ, मारुती पखाले,देविदास भदर्गे, सचिन निर्वळ, रवी भदर्गे, कृष्णा निर्वळ, महेंद्र भदर्गे,प्रसेंजित भदर्गे, सुंदरबाई भदर्गे, कौसाबाई भदर्गे,दैवशाला भदर्गे, ताईबाई भदर्गे,अलका भदर्गे या ग्रामस्थांच्या सह्या आहेत.