गंगाखेड : गेल्या आठ दिवसांपासून तालुक्यात सतत पाऊस पडत असल्याने तालुक्यातील नदी, नाले ही भरून वाहत आहेत. यामुळे इंद्रायणी नदीलापूर आला आहे. यातच गोदावरी नदी पात्रात जायकवाडी धरणातून गुरुवारी (दि. २४ ) रात्री मोठ्या प्रमाणात विसर्ग करण्यात आल्याने गोदावरी नदीला पूर आला आहे. यामुळे इंद्रायणी नदीचे पाणी सुनेगाव व सायळा गावाजवळ तुंबले आणि येथील पुलावरून वाहू लागले. यात अडकलेल्या ग्रामस्थांना मानवी साखळीकरून यातून मार्ग काढावा लागला.
जायकवाडी धरणातून गोदावरी नदी पात्रात पाणी सोडल्याने नदीला पुर आला असून तालुक्यातील मुळी शिवारातुन गोदावरी नदी पात्रात येणाऱ्या इंद्रायणी नदीला आलेल्या पुराचे पाणी नदीत मिळत नसल्यामुळे तालुक्यातील सुनेगाव व सायळा गावाजवळील इंद्रायणी नदीवरच्या पुलावर पुराचे पाणी आल्याने सायळा, सुनेगाव, मुळी, नागठाणा, धारखेड आदी गावांकडे येथुन होत असलेली रहदारी पूर्णता बंद झाली आहे.
नागठाणा, धारखेड, मुळी येथुन प्रवासी ऑटो, जीपने गंगाखेडकडे येणाऱ्या ग्रामस्थांना हे वाहन धारक सुनेगाव गावालगतच्या पुलाजवळ सोडत असल्याने दिवाळी सणाला जाण्यासाठी गावाबाहेर पडणारे ग्रामस्थ पुलावरून मार्ग काढण्याकरिता मानवी साखळी करून येथुन मार्ग काढीत इच्छित स्थळी जात आहेत. तर सायळा गावातून गंगाखेडकडे येण्यासाठी व गावात जाण्याकरिता वाहनांऐवजी बैल गाडीचा वापर केला जात आहे. गोदावरी नदी पात्रातील पुर परिस्थिती वाढत असल्याने नदी काठच्या गावातील नागरिकांनी सतर्क राहण्याचा इशारा तहसीलदार स्वरूप कंकाळ व जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण यांच्याकडुन देण्यात आला आहे.