परभणी :
तालुक्यातील शिवाजीनगर जिल्हा परिषद शाळेतील एका शिक्षकाने अल्पवयीन विद्यार्थिनीची छेड काढून तिच्याशी गैरवर्तन केल्याचा प्रकार सोमवारी समोर आला. याची माहिती संबंधित विद्यार्थिनीने पालकांना दिल्याने, त्या शिक्षकाला ग्रामस्थांनी शाळेत येऊन चांगलाच चोप दिला. घटनेनंतर मंगळवारी शिक्षणाधिकारी विठ्ठल भुसारे यांनी शाळेला भेट दिली. मात्र, शिक्षकावर मंगळवारी रात्री उशिरापर्यंत या प्रकरणी कारवाई झाली नव्हती.
तालुक्यातील शिवाजीनगर येथे पहिली ते आठवीपर्यंतची जिल्हा परिषद शाळा आहे. या शाळेतील एका शिक्षकाने अल्पवयीन विद्यार्थिनीस छेडछाड केल्याचा प्रकार सोमवारी दुपारी समोर आला. या विद्यार्थिनीने हा प्रकार आई-वडिलांना सांगितला. याचा जाब विचारण्यासाठी ग्रामस्थ शाळेत गेले. तेथे शिक्षकाच्या गैरवर्तनामुळे ग्रामस्थ संतापले. काही ग्रामस्थांनी त्या शिक्षकाला चोप दिला. या प्रकरणाचा गुन्हा दाखल करण्यासाठी ग्रामस्थ सोमवारी रात्रीपर्यंत गंगाखेड पोलीस ठाण्यात ठाण मांडून होते. मात्र, पोलिसांनी गांभीर्य दाखविले नसल्याने शिक्षकावर कोणताही गुन्हा दाखल झाला नाही. या घटनेने पालकांमध्ये नाराजी पसरली आहे.
शिक्षणाधिकाऱ्यांनी दिली शाळेला भेटशिक्षणाधिकारी विठ्ठल भुसारे यांनी घडलेल्या घटनेनंतर मंगळवारी सकाळी ११ वाजता शिवाजीनगर येथील जिल्हा परिषद शाळेला भेट दिली. त्यांनी ग्रामस्थांचे व विद्यार्थ्यांचे म्हणणे एकून घेतले व ते परत परभणीला गेले. या घटनेचा अहवाल जि.प.च्या सीईओ यांच्याकडे देणार असल्याचे शिक्षणाधिकारी विठ्ठल भुसारे यांनी सांगितले. घडलेला प्रकार निंदनीय असून, शिक्षण क्षेत्राची बदनामी करणारा असल्याचे ग्रामस्थांनी बोलून दाखवित कारवाईची मागणी केली. मात्र, मंगळवारी रात्री उशिरापर्यंत या प्रकरणी त्या शिक्षकावर कोणतीही कारवाई झाली नसल्याचे समजते.