परभणी : राज्यात गाजलेल्या सेलू येथील सुरेश करवा यांच्या खून प्रकरणात चार आरोपींना परभणी जिल्हा व सत्र न्यायालयाच्या न्यायाधीश - १ एस.एस.नायर यांनी दुहेरी जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. हा निकाल शुक्रवारी दुपारी जिल्हा न्यायालयाने दिला. अंडर ट्रायल चाललेल्या या खटल्यात ५१ साक्षीदार तपासण्यात आले.
सतीश करवा (रा.सेलू) यांनी तीन मे २०२१ मध्ये सेलू ठाण्यात तक्रार दिली होती. त्यांचा भाऊ सुरेश करवा मयत यांचा रस्ते अपघातात अज्ञात वाहनांनी धडक दिल्याने मृत्यू झाल्याने गुन्हा दाखल झाला होता. तपासात मयत याच्या पत्नीचे सेलूतील राहुल कासट याच्यासोबत फोनवर विवादास्पद बोलणे, झालेली ऑडिओ क्लिप समाज माध्यमाद्वारे व्हायरल झाल्याने प्रकरणात संशय निर्माण झाल्याने तत्कालीन पोलीस अधीक्षक जयंत मीना यांनी तपास सहाय्यक पोलीस अधीक्षक श्रवण दत्त यांच्याकडे दिला. या गुन्ह्यात साक्षीदारांचे जवाब, परिस्थितीजन्य पुरावे या आधारे आरोपी राहुल कासट याचे मयताची पत्नीच्या सोबत अनैतिक संबंध असल्याने या संबंधात मयताचा अडथळा येत असल्याने आरोपी राहुल कासट याने विनोद अंभोरे, विशाल पाटोळे, राजेभाऊ खंडागळे यांच्या मदतीने खुनाचा कट रचून सिद्धनाथ बोरगाव शिवारात अपघाताचा बनाव करून खून केल्याचे प्राथमिक तपासावरून निष्पन्न झाले. गुन्ह्यात कलम ३०२, १२० (ब) २०१ भादवी वाढ करून बारकाईने तपास केला.
सबळ पुराव्याने दोषारोपपत्र दाखलगुन्ह्याच्या तपासात मयताची पत्नी, आरोपी राहुल कासट व खुनात प्रत्यक्ष सहभागी असणारे त्याचे तीन साक्षीदार यांचे मोबाईल क्रमांकाचे तांत्रिक विश्लेषण, आवाजाचा नमुना परीक्षण करण्यात येऊन इलेक्ट्रॉनिक पुरावे हस्तगत करण्यात आले. तसेच परिस्थितीजन्य भौतिक पुरावे गोळा करून न्यायवैद्यकीय अहवाल प्राप्त करून घेतले. गुन्हे संबंधाने साक्षीदारांचे जबाब नोंदविण्यात आले. तपासात नमूद आरोपीविरुद्ध सबळ पुरावे प्राप्त झाल्याने जिल्हा सत्र न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्यात आले.
अंडर ट्रायल खटल्यात ५१ साक्षीदार तपासलेहा खटला सत्र न्यायालयात अंडर ट्रायल चालला. सत्र न्यायालयात अभियोग पक्षाकडून ५१ साक्षीदार तपासण्यात आले. यात तपासिक अधिकारी श्रवण दत्त, सायंटिफिक ऑफिसर रंजीत गोरे, वैद्यकीय अधिकारी व महत्त्वाचे साक्षीदार यांची साक्ष व इलेक्ट्रॉनिक पुरावे अभियोग पक्षास पूरक ठरवून ते कायद्याच्या कसोटीवर ग्राह्य धरून यातील आरोपी राहुल भिकूलाल कासट यास कलम ३०२, १२० (ब) या अन्वये दुहेरी जन्मठेप, एक लाख रुपये दंड, दंड न भरल्यास सहा महिने सश्रम कारावास, अशी शिक्षा सुनावली. तसेच विनोद भारत अंभोरे, विशाल सुरेश पाटोळे, राजेभाऊ रुस्तुमराव खंडागळे या तिघांना कलम ३०२, १२० (ब) अन्वये दुहेरी जन्मठेप व २५ हजार दंड, दंड न भरल्यास सहा महिने सश्रम कारावास, अशी शिक्षा न्यायाधीश-१ एस.एस.नायर यांनी सुनावली.
शासकीय अभियोक्ता, पोलीसांची मोलाची कामगिरीखटल्यात मुख्य सरकारी अभियोक्ता ज्ञानोबा दराडे यांनी सरकार पक्षातर्फे बाजू मांडली. आनंद गिराम, सय्यद रहमत हबीब, मयूर साळापुरकर, अभिलाषा पाचपोर, नितीन खळीकर, बाबासाहेब घटे, महेंद्र कदम, सुहास कुलकर्णी, सुनंदा चावरे, देवयानी सरदेशपांडे यांनी मदत केली. फिर्यादी पक्षाकडून सरकारी वकील सहाय्यक म्हणून माधवराव भोसले यांनी मदत केली. पोलीस अधीक्षक रवींद्रसिंह परदेशी, अप्पर पोलीस अधीक्षक यशवंत काळे यांच्या मार्गदर्शनाखाली तत्कालीन कोर्ट पैरवी अधिकारी कपिल शेळके, संतोष सानप, सुरेश चव्हाण, प्रमोद सूर्यवंशी, वंदना आदोडे यांनी काम पाहिले. तपास सहाय्यक पोलीस अधीक्षक श्रवण दत्त यांनी केला. त्यांना सपोनि.कपिल शेळके, गजानन राठोड, सचिन धबडगे, गणेश कौटकर यांनी मदत केली.