परभणी: लोकसभेच्या दुसऱ्या टप्प्यातील मतदानाला सकाळी ७ वाजता पासून सुरुवात झाली असून दुपारी १ वाजेपर्यंत परभणी लोकसभा मतदारसंघात ३३.८८ टक्के मतदान झाले.
राज्यातील लोकसभेच्या दुसऱ्या टप्प्यातील मतदानाला सकाळी ७ वाजतापासून सुरुवात झाली असून, दुपारच्या उन्हाचा तडाका पाहता मतदारांनी सकाळपासूनच मतदारसंघावर रांगा लावायला सुरुवात केली आहे. १ वाजेपर्यंत सर्वच मतदार संघाची रांगच रांग होती. या मतदार संघात २ हजार २९० मतदान केंद्रावर मतदान होत आहे. पहिल्या २ तासात ९.७२ टक्के मतदान झाले. तर ७ ते ११ या चार तासात २१.७७ टक्के मतदान झाले होते. तर सकाळी ११ ते दुपारी १ या सहा तासात ३३.८८ टक्के मतदान झाले आहे.
या मतदानावरून लोकसभा मतदारसंघात मतदारांचा मतदानामध्ये उत्साह दिसून येत आहे. यामध्ये जिंतूर विधानसभा मतदारसंघात सकाळी ७ ते १ या वेळेत ३८.१ टक्के, परभणी ३३.०९, गंगाखेड ३१.५२, पाथरी विधानसभा ३१.१६, परतूर विधानसभा मतदारसंघात ३३.९६ तर घनसावंगी विधानसभा मतदारसंघात ३१.४९ टक्के मतदान झाले आहे. या सहा विधानसभा मतदारसंघात पाथरी विधानसभा वगळता इतर ठिकाणी मात्र सहा तासात मतदानाची टक्केवारी वाढतांना दिसून येत आहे.
दिव्यांगाना रॅम्प तर मतदारांना सावली१ हजार १४५ मतदान केंद्रावर वेब कास्टिंगव्दारे मतदान पार पडत आहे. त्यापैकी ४७ मतदान केंद्र संवेदनशील असून तेथे चोख पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. ६ हजार ८७० बॅलेट युनिट तर २ हजार २९० कंट्रोल युनिट आणि व्हीव्हीपॅट यंत्रे आहेत. आज जिल्ह्यात ४० अंशावर तापमान राहणार असल्याने मतदान केंद्रावर सावली,पाणी ,दिव्यांगासाठी रॅम्प, सहाय्यता केंद्र,प्राथमिक उपचार यासह विविध उपाय योजना करण्यात आल्या आहेत.