सेलू तालुक्यात लक्षवेधी ठरलेल्या वालूर ग्रामपंचायतमध्ये भाजपचे तालुकाध्यक्ष संजय साडेगावकर यांनी ऐनवेळी राष्ट्रवादीचे गणेश मुंढे व इस्माईल यांना सोबत घेऊन निवडणूक लढविली. त्यांना लिंबाजी कलाल यांच्या गटाने चांगलाच शह दिला; परंतु साडेगावकर गटाने ११ जागांवर विजय मिळवून ग्रामपंचायत पुन्हा ताब्यात ठेवली. मात्र, यावेळी इस्माईल, सुरेंद्र तोष्णीवाल, रवी कलाल यांचा पराभव साडेगावकर गटाला मनस्तापाचा ठरला आहे. लिंबाजी कलाल यांनी स्वतः इतरसह ६ जागांवर विजय मिळवीत ग्रामपंचायत प्रशासनात प्रवेश केला. दुसरीकडे आहेर बोरगावही ग्रामपंचायत राष्ट्रवादी काँग्रेसचे विद्यमान जि.प. सदस्य राजेंद्र लहाने यांच्या ताब्यात होती. मात्र, यावेळी त्यांना केवळ ४ जागा जिंकता आल्याने सत्तेपासून दूर राहावे लागले. माजी आ. हरिभाऊ लहाने गटाला ५ जागा मिळाल्याने येथे सत्ता परिवर्तन होऊन शिवसेनेची सत्ता आली. कुंडी ग्रामपंचायतीत कैलास मोगल यांच्या नेतृत्वाखाली येथे राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता कायम राहिली. हादगाव खु. येथे माजी पं.स. सभापती पुरुषोत्तम पावडे, विनायक पावडे यांना राष्ट्रवादीची सत्ता कायम ठेवण्यात यश आले आहे. देवगाव फाटा येथे राष्ट्रवादीची सत्ता होती. मात्र, यावेळी सत्ता परिवर्तन होऊन या ठिकाणी भाजप-शिवसेनेची सत्ता आली, तर देऊळगाव गात येथेही भाजपची ग्रामपंचायत राष्ट्रवादीच्या ताब्यात गेली आहे. चिकलठाणा बु. येथे भाजपच्या सत्तेला सुरुंग लागला असून, राष्ट्रवादीची सत्ता आली आहे. हतनूर ग्रामपंचायतमध्येही सत्तांतर झाले. येथे भाजपची सत्ता राष्ट्रवादीने काबीज केली आहे. चिकलठाणा खु. येथे राष्ट्रवादीची ग्रामपंचायत परिवर्तन पॅनलला मिळाली आहे. शिराळा, रायपूर, केमापूर या ग्रामपंचायती मात्र पुन्हा राष्ट्रवादीच्या ताब्यात ठेवण्यात गावपुढाऱ्यांना यश आले. सत्तांतरमध्ये गिरगाव बु., गिरगाव खु., निरवाडी बु., नागठाणा-कुंभारी, नांदगाव, सावंगी पी.सी. या ग्रामपंचायतींचा सामावेश आहे.
प्रस्थापितांना मतदारांनी दाखविला घरचा रस्ता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 20, 2021 4:18 AM