परभणी : जिल्ह्यातील ४९८ ग्रामपंचायतींमध्ये आज, शुक्रवारी गावकारभारी निवडण्यासाठी मतदान होत आहे. ८ हजार ७१७ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात असून, प्रशासनाने मतदानासाठी १ हजार ५७३ मतदान केंद्र स्थापन केली आहेत. गुरुवारी दिवसभर मतदानाची तयारी प्रशासनाने पूर्ण केली. सायंकाळच्या सुमारास अधिकारी-कर्मचारी मतदान केंद्राकडे रवाना झाले आहेत.
मागील आठ दिवसांपासून जिल्ह्यातील ग्रामीण भाग उमेदवारांच्या प्रचाराने ढवळून निघाला. जिल्ह्यात ५६६ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी ६७ ग्रामपंचायती बिनविरोध झाल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे आता केवळ ४९८ ग्रामपंचायतींमध्येच मतदानाची प्रक्रिया राबविली जाणार आहे.
परभणी तालुक्यात ८८ ग्रामपंचायती असून, त्यातील नऊ ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या आहेत. त्यामुळे आता ७९ ग्रामपंचायतींमध्ये मतदान होत आहे. या मतदानाची तयारी करण्यासाठी गुरुवारी सकाळपासूनच येथील जायकवाडी परिसरातील कल्याण मंडपम् येथे मतदानासाठी नियुक्त अधिकारी- कर्मचाऱ्यांना मतदान केंद्र निश्चित करून देण्यात आले. त्यानंतर दुपारच्या सुमारास हे अधिकारी-कर्मचारी मतदान यंत्रासह मतदान केंद्राकडे रवाना झाले. गुरुवारी सायंकाळीच मतदान केंद्र सज्ज ठेवले जाणार आहे. आज, शुक्रवारी आठ वाजल्यापासून मतदानाला प्रारंभ होणार आहे. सायंकाळी ५.३० वाजेपर्यंत ही प्रक्रिया चालेल. ग्रामीण भागातील मतदान प्रक्रिया शांततेत पार पडावी, यासाठी पोलिसांनीही तगडा बंदोबस्त लावला आहे.
जिल्ह्यात पोलिसांचा तगडा बंदोबस्त
मतदानाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी, यासाठी पोलीस प्रशासनाने तगडा बंदोबस्त लावला आहे. त्यात एक पोलीस उपअधीक्षक, ५ प्रभारी पोलीस उपअधीक्षक, १७ पोलीस निरीक्षक, ११६ सहायक पोलीस निरीक्षक, फौजदार, १२०० पोलीस कर्मचारी, अमरावती येथील १०० पोलीस कर्मचारी, औरंगाबाद येथील ३०० पोलीस कर्मचारी, राज्य राखीव पोलीस कर्मचाऱ्यांची एक तुकडी, ७५० होमगार्ड असा बंदोबस्त लावला आहे.
संवेदनशील गावे
जिल्ह्यात मतदान होऊ घातलेल्या ग्रामपंचायतींपैकी ८९ ग्रामपंचायती संवेदनशील आहेत. या संवेदनशील गावांमधील मतदान केंद्रांवर महसूल प्रशासनाने अधिक लक्ष केंद्रित केले आहे. त्याचप्रमाणे पोलिसांनी या ठिकाणी वाढीव बंदोबस्त लावला आहे. या गावांमध्ये शांततेत निवडणूक व्हावी, यासाठी यापूर्वीच पोलीस प्रशासनाने बैठका घेऊन आवाहन केले आहे.
मास्क, सॅनिटायझरचा वापर
कोरोनाच्या पार्श्वभूृमीवर सर्व ती काळजी प्रशासनाने घेतली आहे. मतदान केंद्रावर फिजिकल डिस्टन्स पाळत मतदारांची रांग लावली जाणार आहे. तसेच मतदानासाठी येताना मास्क वापरणे बंधनकारक आहे. सॅनिटायझरने हात स्वच्छ केल्यानंतरच मतदानाचा हक्क बजावता येणार आहे.
सोमवारी लागणार निकाल
आज, शुक्रवारी मतदानाची प्रक्रिया पार पडल्यानंतर १८ जानेवारी रोजी प्रत्येक तालुक्यात मतमोजणी होणार आहे. साधारणत: दुपारी १२ वाजेपर्यंत संपूर्ण निकाल हाती येण्याची शक्यता आहे.