सोनपेठ तालुक्यात ६० गावांचा समावेश असून तालुक्यातील रुग्णांच्या उपचारासाठी सोनपेठ शहरात प्राथमिक आरोग्य केंद्र आहे. या केंद्रावर तालुक्यातील गावांसह शहरातील रुग्णांचा भार आहे. यासह तालुक्यात १० आरोग्य उपकेंद्रे आहेत. या ठिकाणी रुग्णांवर प्राथमिक उपचार करण्यात येतात. मात्र, गंभीर रुग्णांना उपचारासाठी परळी, अंबाजोगाई, परभणी येथे जावे लागते. त्यामुळे रुग्णांची मोठी परवड सुरू आहे. सोनपेठ तालुक्यातील रुग्णांसाठी ग्रामीण रुग्णालय उभारावे, या मागणीसाठी अनेकांनी आंदोलने, पाठपुरावा केला. त्यामुळे तालुक्यातील नागरिकांची मागणी पूर्ण करून शासनाने सोनपेठ तालुक्यासाठी शहरात ३ कोटी ७० लाख रुपये खर्च करून अत्याधुनिक अशी ग्रामीण रुग्णालयाची इमारत पूर्ण झाली आहे. तसेच येथील ग्रामीण रुग्णालयासाठी २५ पदांना मान्यताही देण्यात आली आहे. परंतु इमारतीचे काम पूर्ण होऊनही दोन वर्षांचा कालावधी उलटला आहे. परंतु इमारतीला अद्यापही उद्घाटनाची प्रतीक्षा आहे.
क्वारंटाईन कक्षासाठी इमारतीचा वापर
देशासह जगामध्ये मार्च महिन्यात कोरोनाचा प्रसार वाढू लागला. त्यामुळे शासनाने शहरातील ग्रामीण रुग्णालयासाठी उभारण्यात आलेल्या इमारतीमध्ये क्वारंटाईन कक्ष स्थापन केला. परंतु, आता कोरोनाचा प्रभाव दिवसेंदिवस कमी होत आहे. त्यामुळे या इमारतीमध्ये ग्रामीण रुग्णालय चालू करण्याची मागणी नागरिकांमधून केली जात आहे.