परभणी : जिल्ह्यातील सात नगरपालिकांच्या निवडणुकीची तयारी राज्य निवडणूक आयोगाने सुरू केली असून, या अनुषंगाने २०११च्या जनगणनेनुसार प्रभाग रचनेचा कच्चा आराखडा २३ ऑगस्टपासून तयार करण्याचे निर्देश प्रशासकीय यंत्रणांना देण्यात आले आहेत. विशेष म्हणजे यावेळी प्रत्येक प्रभाग हा एकाच सदस्याचा राहणार असल्याचे जाहीर करण्यात आल्याने इच्छुक उमेदवारांमध्ये मोठी स्पर्धा लागणार आहे.
जिल्ह्यातील गंगाखेड, सेलू, जिंतूर, मानवत, पाथरी, सोनपेठ आणि पूर्णा या सात नगरपालिकांची मुदत २० डिसेंबर २०२१ रोजी संपणार आहे. त्यामुळे मुदत संपण्यापूर्वी या सातही पालिकांच्या निवडणुका घेण्याची तयारी राज्य निवडणूक आयोगाने सुरू केली आहे. या अनुषंगाने २० ऑगस्ट रोजी आदेश काढला आहे. त्यामध्ये डिसेंबर २०२१ ते फेब्रुवारी २०२२ या कालावधीत मुदत संपणाऱ्या नगरपालिकांची व्यापकता विचारात घेऊन प्रभाग रचना वेळेवर अंतिम करणे सुकर व्हावे, यासाठी प्रारुप प्रभाग रचनेची कारवाई २३ ऑगस्टपासून सुरू करण्यात येत असल्याचे आदेशात नमूद करण्यात आले आहे. १२ मार्च २०२० रोजी घोषित करण्यात आलेल्या सुधारित नगरपालिका अधिनियम २०२० अन्वये नगरपालिकांमध्ये बहुसदस्य प्रभाग पद्धतीऐवजी एक सदस्यीय प्रभाग पद्धती लागू करण्यात आली आहे. त्यामुळे प्रत्येक प्रभाग हा एक सदस्याचा राहणार आहे. प्रभाग रचनेसाठी २०११च्या जनगणनेची लोकसंख्या विचारात घेतली जाणार आहे. प्रभाग रचना करताना त्याची गोपनीयता न राखल्यामुळे व नियमांचे पालन न केल्यामुळे प्रारुप प्रभाग रचनेविरूद्ध हरकतींची संख्या व अंतिम प्रभाग रचनेविरूद्ध दाखल होणाऱ्या रिट याचिकांची संख्या वाढते. त्यामुळे न्यायालयीन प्रकरणात विलंब टाळण्यासाठी गोपनीयता बाळगण्याचे आदेश आयोगाने प्रशासकीय यंत्रणेला दिले आहेत. ब आणि क वर्गाच्या नगरपालिकांच्या प्रभाग रचनेस जिल्हाधिकारी मान्यता देणार आहेत. अंतिम मान्यता मात्र निवडणूक आयोग देणार आहे. क वर्गाच्या नगरपालिकांच्या प्रभाग रचनेस जिल्हाधिकारी मान्यता देणार आहेत, तर अंतिम मान्यता विभागीय आयुक्त देणार आहेत.
गंगाखेड, सेलू, जिंतूरची होणार प्रत्यक्ष बैठक
प्रभाग रचनेचा कच्चा आराखडा तयार केल्यानंतर अनेकदा क्षेत्रीय अधिकाऱ्यांकडून चुका होतात. राजकीय दबावाला बळी पडून अयोग्य प्रकारे प्रभाग रचना केली जाते. याबाबत उच्च न्यायालयात रिट याचिका दाखल झाल्या आहेत. काही याचिकांमध्ये अशा चुकीच्या प्रभाग रचनेबाबत आदेश दिले आहेत. त्यामुळे कच्चा आराखडा निकषाचे पालन करून तयार करण्यात आला आहे का? याबाबतची पडताळणी आयोगाकडून जिल्ह्यातील ब वर्गाच्या गंगाखेड, सेलू, जिंतूर या नगरपालिकांची प्रत्यक्ष बैठकीद्वारे होणार आहे. क वर्गाच्या पाथरी, मानवत, सोनपेठ व पूर्णा या पालिकांची तपासणी ऑनलाईन पद्धतीने करण्यात येणार आहे.