जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची ७ मे २०१५ रोजी निवडणूक झाली होती. त्यावेळी आ.सुरेश वरपूडकर, माजी आ.रामप्रसाद बोर्डीकर यांचे एक पॅनल होते. तर दुसऱ्या बाजुने माजी आ.सुरेश देशमुख, आ. बाबाजानी दुर्राणी, माजी आ. विजय भांबळे यांचे पॅनल होते. या निवडणुकीत वरपूडकर-बोर्डीकर पॅनलने एकतर्फी सत्ता मिळविली होती. नंतरच्या काळात या दोन नेत्यांमध्ये टोकाचे मतभेद निर्माण झाले. त्यानंतर २०१७ मध्ये जिल्हा बँकेवर वरपूडकर यांनी वर्चस्व मिळविले. आता पुन्हा एकदा या बँकेची निवडणूक होत आहे. यात वरपूडकर-बोर्डीकर पॅनलमध्ये काट्याची लढत होत आहे. यापूर्वी ६ जागा बिनविरोध निवडल्या गेल्या आहेत. आता १५ जागांसाठी लढत होत आहे. यात ११ठिकाणी दुरंगी, दोन ठिकाणी तिरंगी तर एका ठिकाणी चौरंगी लढत होत आहे. माजी आ.बोर्डीकर हे बिनविरोध निवडले गेले असले तरी वरपूडकर यांच्यासमोर त्यांनी आव्हान निर्माण केले आहे. त्यांच्या विरोधात दत्ता गोंधळकर हे लढत आहेत. परभणीत एकूण ९३मतदार आहेत. सोनपेठ तालुक्याची लढत अधिक लक्षवेधी ठरणार आहे. येथे माजी जि.प.अध्यक्ष राजेश विटेकर व बोर्डीकर यांचे बंधू गंगाधर बोर्डीकर यांच्यात लढत होत आहे. येथे फक्त ३८ मतदार आहेत. त्यामुळे दोन्ही उमेदवारांनी मतदारांपर्यंत पोहचविण्याचा पुरेपुर प्रयत्न चालविला आहे. दुसरीकडे सेलूत आ.मेघना बोर्डीकर यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. त्यांच्यासमोर वर्षा राजेंद्र लहाने यांनी आव्हान निर्माण केले आहे. सेलूत फक्त ४९मतदार आहेत. याशिवाय पालममध्ये भाजपाचे राज्य कार्यकरिणी सदस्य गणेश रोकडे, विद्यमान संचालक लक्ष्मणराव दुधाटे आणि नारायण शिंदे यांच्यात तिरंगी लढत होत आहे. फक्त ६२ मतदार आहेत. हिंगोली जिल्ह्यात सेनगावमधून माजी आ.साहेबराव पाटील गोरेगावकर यांच्यासमोर राजेंद्र देशमुख यांनी आव्हान निर्माण केले आहे. येथे ८०मतदार आहेत. औंढ्यात राजेश साहेबराव पाटील यांच्यासमोर शेषराव कदम यांनी आव्हान निर्माण केले आहे. येथे एकूण ६३ मतदार आहेत. सुरेश देशमुख यांची प्रतिष्ठा पणाला
माजी आ.सुरेश देशमुख हे गेल्यावेळी बिनविरोध निवडून आले होते. यावेळी त्यांच्यासमोर एकेकाळी त्यांचे सहकारी असलेले बालासाहेब निरस यांनी आव्हान निर्माण केले आहे. या मतदारसंघात ६४मतदार आहेत. सहकारक्षेत्रात माजी आ.देशमुख यांचा असलेला दबदबा पाहता निरस हे त्यांना कशी लढत देतात, याची उत्सुकता लागली आहे.
सर्वाधिक मतदार इतर शेती मतदारसंघात
इतर शेती संस्था मतदारसंघात तब्बल ५१४मतदार आहेत. तसेच कळमनुरी मतदारसंघात ८६, वसमतमध्ये ७८ आहेत.