पाथरी (परभणी ) : पुरेसा पाऊस न झाल्याने तालुक्यातील पिकांची स्थिती दयनीय आहे. या परिस्थितीमध्ये जायकवाडी धरण्याच्या डाव्या कालव्यातून खरीप पिके तसेच रब्बी पेरणीसाठी संरक्षित पाणी सोडण्यात येत आहे. या वर्षीच्या खरीप हंगामात हे दुसरे पाणी आवर्तन असून 3 हजार हेक्टर क्षेत्रावरील पिकासाठी या पाण्याचा फायदा होईल .
ऐन पावसाळ्याच्या दिवसात तब्बल सव्वामहिना पावसाने या भागात खंड दिला आहे. त्यामुळे खरिपातील पिके शेवटची घटका मोजत आहेत. सोयाबीन जागीच करपले आहे कापूस सुकून जात आहे. रब्बीची पेरणी होईल की नाही अशी अवस्था निर्माण झाली आहे. कापसाला मोठा फटका बसला आहे याचा परिणाम कापूस आणि सोयाबीन च्या उताऱ्यावर जाणवत आहे, सोयाबीन 14 हजार हेक्टर तर कापूस 18 हजार हेक्टर क्षेत्र पुर्णतः शेवटच्या घटका मोजत आहे.
जायकवाडी धरणाचा डावा कालवा या भागातून जातो. पाथरी उपविभाग अंतर्गत 36 हजार हेक्टर क्षेत्र या कालवा कार्यक्षेत्रातील येते. यावर्षी पाऊस लांबल्याने पिके वाचवण्यासाठी डाव्या कालव्यावर पुर्णतः मदार आहे. रब्बी हंगामातील पेरणी तोंडावर आहे. मात्र पाऊस नसल्याने शेतात ओल नाही त्या मुळे सध्या शेतात रब्बीची पेरणी करता येत नाही. त्यामुळे जायकवाडी धरण्याच्या डाव्या कालव्यातून पाणी सोडण्यात यावे अशी मागणी शेतकऱ्यांकडून करण्यात येत होती. याबाबत आमदार मोहन फड यांनी पाटबंधारे मंत्र्यांकडे पाठपुरावा केला. या पाण्यामुळे कालवा क्षेत्रातील खरीप पिकांना लाभ होणार असून रब्बीच्या पेरणीसाठी दिलासा मिळाला आहे.
दोन दिवसात वाढ होईलआम्ही 1200 क्युसेक पाण्याची मागणी केली आहे. 26 सप्टेंबरला 700 क्युसेक पाणी सोडण्यात आले असून दोन दिवसात पाण्याच्या विसर्गात वाढ होईल. - डी.बी. खारकर, उपभियंता, जायकवाडी पाटबंधारे उपविभाग-पाथरी