सेलू:- जालना जिल्ह्यात गुरूवारी झालेल्या जोरदार पावसामुळे निम्न दुधना प्रकल्पाच्या जलाशयात दोन दिवसात तब्बल ६ दलघमी एवढे पाणी आले आहे. जून महिन्यातच प्रकल्पाच्या पाणी पातळीत वाढ होण्यास सुरुवात झाल्याने परभणी जिल्हासाठी मोठा दिलासा मानला जात आहे.
गतवर्षी अनेक भागात ऑक्टोबर महिन्यात अतिवृष्टी झाली होती. त्यानंतरही निम्न दुधना प्रकल्पाच्या पाणी पातळीत अपेक्षित वाढ झाली नव्हती. परिणामी दुधनेत २० टक्केच पाणीसाठा वाढला होता. बाष्पीभवन आणि बॅक वाॅटर मधून पिकांसाठी पाण्याचा मोठ्या प्रमाणावर उपसा झाल्याने मार्च महिन्यातच दुधना प्रकल्प मृत साठयात गेला आहे. जालना जिल्ह्यात पाऊस पडल्यानंतर प्रकल्पात पाणी येते. गुरूवारी रात्री बदनापूर तालुक्यात जोरदार पाऊस पडला. त्यामुळे दुधना नदी प्रवाहीत होऊन प्रकल्पात वेगाने पाण्याची आवक झाली. परतूर तालुक्यातील आणि प्रकल्पाच्या शेजारील रोहिणा पुला खालून पाणी वाहत आहे. गतवर्षी नोंव्हेबर महिन्यात या पुला खालून पाणी येऊन प्रकल्पात पाण्याची वाढ झाली होती. यंदा मात्र जून महिन्यात प्रकल्पात पाण्याची आवक होत असल्याने प्रकल्प पूर्ण क्षमतेने पाणी साठा होण्याची आशा पल्लवित झाल्या आहेत.
मृतसाठयात एकूण ८२ दलघमी पाणी
निम्न दुधना प्रकल्पातून सेलू शहर, आठ गाव पाणी पुरवठा योजना तसेच जालना जिल्ह्यातील परतूर, मंठा तसेच इतर पाणी पुरवठा योजनेला पाणी घेतले जाते. टंचाईच्या काळात परभणी, पुर्णा शहरा देखील या पूर्वी नदीपाञात पाणी सोडून तहान भागवली जाते. त्यामुळे दुधनेतील पाणी साठयाकडे सर्वाच्या नजरा असतात. सद्यस्थितीत प्रकल्प मृत साठयात असून ८२ दलघमी पाणी साठा आहे. आणखी २० दलघमी पाणी साठा झाल्यानंतर प्रकल्प मृत साठयातून बाहेर येईल.