- अनुराग पोवळेपरभणी : संपूर्ण राज्यातील प्रकल्प ओसंडून वाहत असताना मराठवाड्यात जायकवाडी प्रकल्प वगळता इतर सर्वच मोठे प्रकल्प कोरडेठाक आहेत. परिणामी, मराठवाड्यात औरंगाबाद वगळता इतर जिल्ह्यांत पिण्याच्या पाण्याची चिंता अद्याप मिटलेली नाही.
आॅगस्टचा पहिला आठवडा संपला असला तरी मराठवाड्यात पावसाने दमदार हजेरी लावली नाही. विदर्भालगतच्या किनवट, माहूर, हदगाव या तालुक्यात पाऊस झाला आहे. परभणी जिल्ह्यातही आज घडीला २९ टक्के पाऊस झाला आहे. जिल्ह्यात आतापर्यंत २३०.२८ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. नांदेड जिल्ह्यात ३८९.४१ मि.मी.अर्थात सरासरीच्या ४० टक्के पाऊस झाला आहे. मराठवाड्यातील जायकवाडी प्रकल्पात आज घडीला नाशिक जिल्ह्यातील धरणामधून पाण्याची आवक मोठ्या प्रमाणावर सुरु आहे. त्यामुळे मृतसाठ्यात गेलेल्या जायकवाडीत जवळपास १५ टक्के म्हणजेच जवळपास ३४० दलघमी पाणी उपलब्ध झाले आहे. पण त्याच वेळी बीड जिल्ह्यातील मोठा प्रकल्प असलेल्या माजलगाव प्रकल्पात ० टक्के जलसाठा आहे.
परभणी जिल्ह्यातील ढालेगाव बंधारा, येलदरी, मुद्गल, मुळी, डिग्रस हे तर हिंगोली जिल्ह्यातील सिद्धेश्वर प्रकल्पही कोरडाठाकच आहे. नांदेडच्या विष्णूपुरी बंधारा आजही मृतसाठ्यातच आहे. जिल्ह्यातील अंत्येश्वर, अप्पर मानार प्रकल्प हे ही कोरडेच आहेत. नांदेड जिल्ह्यात असलेल्या दोन मोठ्या प्रकल्पापैकी लोअर मानार प्रकल्पात १५ दलघमी जलसाठा शिल्लक आहे. आमदुरा बंधाऱ्यात १२ दलघमी तर बळेगाव बंधाऱ्यात ६ दलघमी पाणीसाठा शिल्लक आहे. तेलंगणाच्या सिमेवरील बहुचर्चेतील बाभळी बंधाराही कोरडाच आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार या बंधाऱ्याचे संपूर्ण दरवाजे उघडे ठेवण्यात आले आहेत.पाण्याची परिस्थिती लक्षात घेता नांदेड जिल्हा प्रशासनाने पर्यायी उपाययोजनांना सुरुवात केली आहे.त्याचवेळी परभणी जिल्हाधिकारी शिव शंकर यांनी सांगितले, आतापर्यंत जिल्ह्यात ३० टक्के पाऊस झाला. या पावसाने भूजल पातळी वाढण्यास मदत झाली आहे. पावसाचे दोन महिने उलटले असले तरी अद्याप दोन महिने शिल्लक आहे. या दोन महिन्यात पावसाची अपेक्षा आहे. त्याचवेळी जायकवाडी धरण भरत असल्याने परभणी जिल्ह्यातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न काही अंशी मार्गी लागला असल्याचे जिल्हाधिकारी पी. शिव शंकर यांनी स्पष्ट केले.
निजामसागरात ३ टक्के साठामराठवाड्यातील गोदावरी नदीवर असलेले बंधारे कोरडे असल्याने सीमावर्ती भागात असलेल्या तेलंगणा राज्यात असलेल्या निजामसागर प्रकल्पातही ३.६५ दलघमी जलसाठा उरला आहे. याच भागातील पोचमपाड प्रकल्पात ८.३२ टक्के जलसाठा शिल्लक राहिला आहे. यामुळे मराठवाड्यातील प्रकल्पांप्रमाणेच तेलंगणातील प्रकल्पांचेही पाण्याअभावी हाल आहे. त्यामुळे मोठ्या पावसाची प्रतीक्षा आहे.