कराची वसुली मोठ्या प्रमाणात केली
परभणी : शहरातील नागरिकांकडे मोठ्या प्रमाणात कराची थकबाकी आहे. मनपा प्रशासनाने ही थकबाकी वसूल करण्यासाठी फेब्रुवारी महिन्याच्या सुरुवातीस पथकांची स्थापना केली होती. मात्र अजूनही कर वसुली फारसा प्रतिसाद मिळत नाही. मागील वर्षापासून करवसुली थकलेली आहे. त्यामुळे महानगरपालिकेसमोर आर्थिक संकट उभे टाकले आहे.
घरकुलांची बांधकामे रखडली
परभणी : जिल्ह्यात मुबलक प्रमाणात वाळू उपलब्ध नसल्याने घरकुलांची बांधकामे रखडली आहेत. खुल्या बाजारपेठेत वाळूचे भाव गगनाला भिडले असून, ही वाळू खरेदी करून घरकुल बांधणे परवडत नसल्याने लाभार्थ्यांनी बांधकाम बंद ठेवले आहे. प्रशासनाने घरकुल लाभार्थ्यांना वाळू उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी होत आहे.
गुटखा विक्रीला लागेना लगाम
परभणी : जिल्ह्यात खुलेआम गुटख्याची विक्री होत असून, पोलीस प्रशासन दररोज कारवाई करीत असले तरी शहरात गुटखा सहज उपलब्ध होत आहे. अन्न व औषध प्रशासनाने यासंदर्भात कडक कारवाई करण्याची गरज निर्माण झाली आहे.
रस्ता उखडल्याने वाहनधारक त्रस्त
परभणी : शहरातील सुपर मार्केट ते वसंतराव नाईक यांचा पुतळा हा रस्ता अनेक ठिकाणी उखडला आहे. ठीक ठिकाणच्या खड्ड्यांमुळे वाहनधारक त्रस्त झाले आहेत. त्यातच मनपाने जलवाहिनीसाठी खड्डे खोदल्यामुळे रस्त्याच्या दुरवस्थेत आणखीच भर पडली आहे. विशेष म्हणजे हा प्रमुख मार्ग असून दररोज शेकडो वाहनधारक या मार्गावर वाहतूक करतात. दुरुस्तीची मागणी होत आहे.
जिल्ह्यात वाढली मास्कची विक्री
परभणी : जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग वाढत असल्या प्रतिबंधात्मक उपाय म्हणून मास्कचा वापर केला जात आहे. शहरातील विविध भागात रस्त्याच्या कडेला थांबून मास्क विक्री केली जात असून नागरिकांकडूनही मात्र चांगलीच मागणी होत आहे.
चारही बाजूचे रस्ते उखडले
परभणी : शहरात येणारे चारही बाजूची रस्ते उखडले असून नागरिक त्रस्त आहेत. परभणी-पाथरी, परभणी-जिंतूर, परभणी-गंगाखेड आणि परभणी- वसमत या चारही रस्त्यांवर खड्डे असल्याने शहरात दाखल होण्यासाठी वाहनधारकांना कसरत करीत प्रवास करावा लागत आहे. महामार्ग प्राधिकरणाने रस्त्याची तातडीने दुरुस्ती करावी, अशी नागरिकांची मागणी आहे.
शहरातील रस्त्यांवर अतिक्रमणे वाढली
परभणी : शहरातील बाजारपेठ भागात सर्वच रस्त्याच्या कडेने मोठ्या प्रमाणात अतिक्रमणे झाली आहेत. अतिक्रमणांचा वाहतुकीला त्रास होत असून अतिक्रमण हटविण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे. मनपाने मध्यंतरी अतिक्रमण हटाव मोहीम सुरू केली होती. बाजारपेठेत अतिक्रमणांमुळे वाहतूक विस्कळीत होते. मात्र अतिक्रमणे हटविली जात नाहीत. त्यामुळे वाहतुकीची समस्या कायम आहे.