गंगाखेड : तालुक्यातील पाझर तलावांसह मासोळी प्रकल्पांनी हिवाळ्यातच तळ गाठला आहे. त्यामुळे या तलावावर अवलंबून असलेल्या गावांमध्ये पाणीटंचाईचे संकट गडद झाले आहे. मासोळी प्रकल्पातून रब्बी हंगामातील सिंचनासाठीचा पाणीपुरवठा बंद करण्यात आला आहे.
गंगाखेड तालुक्यामध्ये पुरेसा पाऊस झाला नाही. त्यामुळे बहुतांश पाणीसाठे दरवर्षी प्रमाणे यावर्षी भरले नाहीत. गतवर्षीच्या पाणीसाठ्यामध्ये थोडी भर पडली असली तरी हिवाळ्यामध्येच बहुतांश तलाव व पाणी प्रकल्पातील साठा कमी झाला आहे. त्यामुळे भविष्यामध्ये पाणीटंचाईचे संकट ओढावण्याची शक्यता नाकारता येत नाही. गंगाखेड तालुक्यातील पिंपळदरी साठवण तलावामध्ये आज घडीला १५.७९ टक्के पाणीसाठा आहे. गतवर्षी या महिन्यामध्ये ९०.२५ टक्के पाणीसाठा होता. त्यामुळे उन्हाळ्यामध्ये या तलावावर अवलंबून असलेल्या गावांमध्ये भीषण पाणीटंचाई जाणवली नाही. यावर्षी मात्र परिस्थिती वेगळी आहे.
राणीसावरगाव तलावामध्ये २२ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. टाकळवाडी तलावाने पूर्णपणे तळ गाठला आहे. गतवर्षी या तलावामध्ये ८३ टक्के पाणीसाठा होता. शिवाय कोद्री तलावही जोत्याखाली गेला आहे. गंगाखेड तालुक्यातील गावांना पाणीपुरवठा करणार्या पालम तालुक्यातील तांदुळवाडी तलावही जोत्याखाली गेला आहे. सोनपेठ तालुक्यातील नखतवाडी तलावाचीही अशीच स्थिती आहे. या दोन्ही तलावात गतवर्षी अनुक्रमे ८३ व ७५ टक्के पाणीसाठा होता, अशी माहिती सिंचन शाखा २ चे कालवा निरिक्षक डी.एम. नागरगोजे यांनी दिली.
गंगाखेड शहरासह माखणी, इसाद, पोखर्णी वाळके, चिलगरवाडी, खोकलेवाडी, सिरसम आदी गावांची तहान भागविणार्या मासोळी मध्यम प्रकल्पात केवळ १८ टक्के पाणीसाठा आहे. गतवर्षी डिसेंबर महिन्यामध्ये ८९ टक्के पाणीसाठा उपलब्ध होता, अशी माहिती मासोळी मध्यम प्रकल्पाच्या मोजणीदार एस.एस. मांगुळकर यांनी दिली.
सिंचनासाठीचा पाणीपुरवठा बंदयावर्षी पुरेसा पाऊस झाला नसल्याने हिवळ्यामध्येच तालुक्यातील तलावांनी तळ गाठला आहे. यामुळे मासोळी मध्यम प्रकल्पातून रब्बी हंगामातील सिंचनासाठी करण्यात येणारा पाणीपुरवठा बंद करण्यात आला आहे. तसेच मासोळी प्रकल्पातील मृत पाणीसाठ्यातून शहराला तसेच इतर गावांना पिण्यासाठी पाणीपुरवठा केला जाईल. मार्चनंतर प्रकल्पात शिल्लक असलेला पाणीसाठ्याचा आढावा घेऊन पुढील नियोजन केले जाणार असल्याचे प्रकल्पाचे शाखाधिकारी रामेश्वर उबाळे यांनी सांगितले.
गोदावरी नदीवरील मुळी बंधार्याचे दरवाजे वाहून गेले आहेत. या बंधार्याला काही दरवाजे नसल्याने बंधार्यातही पाणीसाठा उपलब्ध नाही. सध्या बंधार्याची परिस्थिती बिकट झाली आहे. भविष्यात उद्भवणार्या तीव्र पाणीटंचाईचा सामना करण्यासाठी उपलब्ध पाण्याचा काटकसरीने वापर करावा लागणार आहे.