निम्न दुधना प्रकल्पातून रबी हंगामातील पिकांसाठी २ डिसेंबर रोजी दोन्ही कालव्यात पाणी सोडले आहे. डाव्या आणि उजव्या दोन्ही कालव्याच्या वितरीका आणि लघु वितरिकांची कामे अर्धवट अवस्थेत आहेत. काही भागात वितरीकेच्या कामासाठी खोदकाम करून अर्धवट सोडले आहे. डाव्या कालव्याच्या ब्रम्हवाकडी शिवारातील वितरीका क्रमांक १ चे केवळ खोदकाम करून ठेवले. कालव्यात पाणी सोडल्यानंतर अनिल रावसाहेब कदम यांच्या शेतात पाणी घुसले आहे. या ठिकाणी कदम यांचे १० एकर शेती आहे. त्यात कापूस, तूर ही पिके उभी आहेत. त्यांच्या ३ एकर शेतात पाणी साचले आहे. त्यामुळे उभ्या पिकांचे नुकसान झाले अशी माहिती शेतकरी कदम यांनी दिली. तसेच या शिवारातील प्रकाश वनवे, मोहन कुलकर्णी, गणेश कोरडे या शेतकऱ्यांच्या शेतात पाणी साचले आहे. दरम्यान, शेतकऱ्यांनी या संदर्भात पाटबंधारे विभागाला माहिती दिल्यानंतर शुक्रवारी दुपारी १२ वाजता जेसीबीच्या साहायाने शेतात येणारे पाणी थांबिण्यात आले.
अधर्वट कामे आणि सफाईकडे दुर्लक्ष
निम्न दुधना प्रकल्पाच्या दोन्ही कालव्याच्या वितरीका आणि लघु वितरिकांची कामे अनेक वर्षांपासून रखडले आहेत. अनेक ठिकाणी खोदकाम करून ठेवले आहे. तर काही ठिकाणी सिमेंट कॅक्रेट करून काम अर्धवट अवस्थेत आहे. दोन्ही कालव्याची अनेक ठिकाणी तुटफुट झाली आहे. तसेच गाळ साचून कालव्यात झुडपे वाढले आहेत. त्यामुळे पाणी सोडण्यापूर्वी दोन्ही कालव्याची आवश्यक त्या ठिकाणी दुरूस्ती, साफसफाई तसेच अधर्वट कामे असलेल्या वितरिकेतून पाणी शेतात घुसणार नाही याची काळजी घेणे आवश्यक होते. मात्र संबंधित विभागाने याकडे दुर्लक्ष केल्याने शेतकऱ्यांचे नुकसान झाले. तसेच पाण्याची नासाडी होत आहे. याकडे पाटबंधारे विभागाने लक्ष देण्याची मागणी होत आहे.