वाहनतळाचा प्रश्न
परभणी : बाजारपेठ भागात वाहनतळाची जागा अपुरी पडत असल्याने रस्त्याच्या कडेने वाहने उभी केली जात आहेत. त्यामुळे वाहतुकीस अडथळे निर्माण होत आहेत. वाहनतळाच्या जागेवर अतिक्रमण झाल्याने ही समस्या निर्माण झाली आहे. मनपाने वाहनतळाच्या जागा खुल्या कराव्यात, अशी मागणी होत आहे.
रेल्वेत अनधिकृत प्रवेश
परभणी : रेल्वे गाड्यातून प्रवास करण्यासाठी आरक्षण काढणे आवश्यक आहे. मात्र जवळच्या स्थानकावर उतरणारे अनेक प्रवासी विनाआरक्षण आणि विना तिकिट प्रवास करीत असल्याच्या तक्रारी आहेत. त्यामुळे रेल्वे गाड्यांमध्ये गर्दी होत आहे. रेल्वे प्रशासनाने याकडे लक्ष द्यावे, अशी मागणी होत आहे.
बसेसला मोठी गर्दी
परभणी : शहरासह जिल्ह्यातील विविध बसस्थानकातून धावणाऱ्या बसगाड्या प्रवाशांनी फुल्ल होऊन धावत आहेत. विशेष म्हणजे एकीकडे गर्दी करु नये, असे आवाहन केले जात असताना दुसरीकडे बसेसमध्ये प्रवाशांची मोठी गर्दी होत आहे. त्यामुळे कोरोनाचा संसर्ग वाढण्याचा धोका निर्माण झाला आहे.
स्वच्छतागृहाची दुरवस्था
परभणी : येथील जिल्हा स्टेडियम परिसरात उभारलेल्या तात्पुरत्या स्वच्छतागृहाची दुरवस्था झाली आहे. त्यामुळे या भागातील व्यावसायिक आणि नागरिकांची कुचंबना होत आहे. स्टेडियम कॉम्प्लेक्स आणि जलतरणिका कॉम्प्लेक्समधील व्यावसायिकांसाठी स्वतंत्र स्वच्छतागृह उभारण्याची मागणी होत आहे.