परभणी : दोन दिवस जिल्ह्यात दमदार पाऊस झाल्याने प्रकल्पांमधील पाणीसाठ्यात वाढ झाली आहे़ ढालेगाव आणि मुदगल बंधारे तुडुंब झाल्याने गेट उघडून नदीपात्रात पाण्याचा विसर्ग केला जात आहे़
जिल्ह्यात दोन दिवसांपासून पावसाची रिपरिप सुरू आहे़ भीज पावसामुळे बंधाऱ्यातील पाणी पातळीत लक्षणीय वाढ झाली आहे़ सेलू तालुक्यातील निम्न दूधना प्रकल्पामध्ये ४ दलघमी पाणीसाठा वाढला आहे़ सध्या या प्रकल्पात १६० दलघमी जलसाठा उपलब्ध आहे. पाथरी तालुक्यातील ढालेगाव बंधारा पाण्याने भरला असून, सध्या बंधाऱ्यात ३९३़७० मीटर पाणी पातळी आहे़ सकाळी एक गेट उघडून पाण्याचा विसर्ग केला जात होता़ दुपारी १़४५ च्या सुमारास हे गेट बंद करण्यात आले आहे़ तर मुदगल बंधाऱ्यातही पाणीसाठ्यात मोठी वाढ झाली आहे़ हा बंधारा ९० टक्के भरला असून, दुपारी २़३० वाजता बंधाऱ्याचा एक दरवाजा उघडण्यात आला़ सायंकाळी ५ च्या सुमारास आणखी एक दरवाजा उघडून पाण्याचा विसर्ग करण्यात आला़ तसेच तालुक्यातील खडका बंधाऱ्यातही मोठ्या प्रमाणात पाणीसाठा झाल्याने चार दरवाजे उघडून पाण्याचा विसर्ग केला जात आहे़
संततधार पावसामुळे पालम तालुक्यात लेंडी नदीला पूर आल्याने आठ गावांचा संपर्क २० तासांसाठी तुटला होता़ पुलावरून पाणी वाहत असल्याने या गावांतील ग्रामस्थांना शहरात जाणे अवघड झाले होते़ जिंतूर तालुक्यात पाचलेगाव जवळ ओढ्याला पूर आल्याने पाच गावांचा संपर्क तुटला होता़ त्याचप्रमाणे परभणी-गंगाखेड रस्त्यावरील सुनेगावजवळ इंद्रायणी नदीच्या पुलावरून पाणी वाहत असल्याने सुनेगाव, मुळी, नागठाणा गावांकडे जाणारा रस्ता बंद झाला होता़ जिल्ह्यातील सर्वच नद्यांच्या पाणी पातळीत पावसाने वाढ झाली़
मासोळी प्रकल्पात साठागंगाखेड तालुक्यात गोदावरी नदीपात्रात मंगळवारी सकाळी १६७ क्युसेसने पाण्याची आवक झाली़ गोदावरी नदीची पाणी पातळी दीड मीटरने वाढली होती़ सायंकाळी ६ वाजता एक मीटरने पाणीपातळी कमी झाली होती़ दरम्यान, माखणी शिवारात असलेल्या मासोळी प्रकल्पातही पाणी पातळीत वाढ झाली आहे़ मृतसाठ्यात असलेल्या या प्रकल्पात आता १ टक्के जिवंत पाणीसाठा जमा झाला आहे़