परभणी : परभणीतील नागरिकांनी आतापर्यंत आपल्याला भरभरून दिले आहे. येथील जनतेच्या प्रश्नांवर यापूर्वीही वेळोवेळी संघर्ष केला. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय परभणीला मिळालेच पाहिजे, यासाठी निर्धाराने लढा उभा केला. समाजातील सर्व घटकांसह सर्वपक्षीय नेत्यांची साथ मिळाली अन् मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही या मागणीची दखल घेत उदारभावनेने जिल्ह्याला शासकीय मेडिकल कॉलेज मंजूर केल्यानेच लढा सार्थकी लागला, असे प्रतिपादन खासदार बंडू जाधव यांनी केले.
परभणी जिल्ह्याला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय मंजूर करून आणल्याबद्दल येथील कृषी उत्पन्न बाजार समिती परिसरात दि. २६ सप्टेंबर रोजी खासदार बंडू जाधव यांचा नागरी सत्कार करण्यात आला. सत्काराला उत्तर देताना ते बोलत होते. या सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी आमदार सुरेश वरपूडकर हे होते. व्यासपीठावर आमदार डॉ. राहुल पाटील, माजी आ. सुरेश देशमुख, उपमहापौर भगवान वघमारे, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख विशाल कदम, माजी जिल्हा प्रमुख गंगाप्रसाद आणेराव, सभापती गुलमीर खान, माजी नगराध्यक्ष जयश्रीताई खोबे, विजय वाकोडे, कॉ. राजन क्षीरसागर, कीर्तीकुमार बुरांडे, संजय मंत्री, गोविंद अजमेरा, स.अब्दुल कादर, माधुरी क्षीरसागर आदींची प्रमुख उपस्थिती होती.
खासदार जाधव म्हणाले, परभणी जिल्ह्याला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय मिळावे यासाठी तीन वर्षांपासून पाठपुरावा करीत होतो. जिल्ह्यातील गोरगरीब जनतेची होणारी गैरसोय दूर व्हावी, आरोग्य आणि वैद्यकीय शिक्षणासाठी येथील विद्यार्थ्यांची होणारी परवड दूर व्हावी यासाठी येथे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय निर्माण करावे आणि जनतेच्या ऋणातून उतराई व्हावी, यासाठी हा लढा उभारला. त्यास सर्व घटकातील नागरिकांचे तसेच सर्वपक्षीय सहकार्य मिळाले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही उदार भावनेने जिल्ह्याला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय मिळवून देत परभणीकरांवरील प्रेम सिद्ध केले. त्यामुळे त्यांचे आभार मानतो. तसेच या लढ्याला सोबत करणाऱ्या सर्वांचे आभार त्यांनी यावेळी मानले.
कार्यक्रमात सर्वपक्षीय नेत्यांच्या वतीने खासदार बंडू जाधव यांचा नागरी सत्कार करण्यात आला. तसेच परभणी बाजार समिती, परभणी महानगरपालिका, मोठा मारोती संस्थान, परभणी मजदूर युनियन, मुख्याध्यापक संघ, महाराष्ट्र राज्य शिक्षक सेना, व्यापारी असोसिएशन, राजे संभाजी तालीम यांच्या वतीनेही खासदार जाधव यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी बोलताना आमदार राहुल पाटील म्हणाले, जिल्ह्याच्या विकासाठी खासदार बंडू जाधव यांच्या नेतृत्वाखाली उभारलेल्या लढ्यात लढ्याला यश आले आहे. आता जिल्ह्यासाठी नवीन एमआयडीसी मंजूर करण्याचे आश्वासन दिले आहे. त्यामुळे येथील रोजगार आणि औद्योगिक विकासाला चालना मिळणार आहे. अध्यक्षीय समारोपात आमदार सुरेश वरपूडकर म्हणाले, भाजप-सेना युतीची सत्ता असतानाही जिल्ह्याला मेडिकल कॉलेज मिळू शकले नाही. महाविकास आघाडी सरकारने मात्र हे महाविद्यालय मंजूर करून दिले आहे. खासदार बंडू जाधव यांच्या प्रयत्नांमुळेच हे शक्य झाले.
या कार्यक्रमास जिल्ह्याभरातून नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. बाजार समिती मार्केट यार्डाचा परिसर नागरिकांनी फुल्ल झाला होता.