Manoj Jarange Patil: मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची हत्या करणाऱ्या सर्व आरोपींना अटक करून कठोर शिक्षा द्यावी, या मागणीसाठी परभणी जिल्ह्यात आज सर्वपक्षीय मोर्चाचं आयोजन करण्यात आलं होतं. या मोर्चात मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्यासह परभणीचे खासदार संजय जाधव, आमदार सुरेश धस, आमदार संदीप क्षीरसागर, आमदार राजेश विटेकर आणि इतर नेते उपस्थित होते. या मोर्चावेळी केलेल्या भाषणात जरांगे पाटील यांनी आमदार सुरेश धस यांचं जाहीरपणे कौतुक केलं आहे.
मनोज जरांगे पाटील म्हणाले की, "सहन करण्याची पण एक परिसीमा असते. आपणच कायम संयम का बाळगायचा? आपल्या समाजातील माता-माऊलींवर हल्ले झाले तर जशास तसं उत्तर द्यायचं. आपण हटायचं नाही. आपण साथ दिली नाही तर समाज जगणार नाही. आपण समाजाच्या पाठीशी ठामपणे उभा राहा. आमदार संदीप क्षीरसागर हे ओबीसी असूनही मराठा समाजाच्या पाठीशी ठामपणे उभे राहिले आहेत. सुरेश अण्णाला तर सुंबारच नाही राहिला. ते तर वेगळंच खेचत आहेत. पण हे असले पाहिजेत. त्यांच्या मुंडक्यावर पाय देणारे असलेच पाहिजेत. यालाच मराठे म्हणतात," अशा शब्दांत जरांगे पाटलांनी आमदार धस यांच्यावर स्तुतीसुमने उधळली.
"जो आमदार मराठ्यांच्या बाजूने बोलेल मग तो महायुतीचा असू द्या नाहीतर महाविकास आघाडीचा असू द्या. अशा आमदाराच्या मागे महाराष्ट्रातील मराठ्यांनी ठामपणे उभा राहायचं. त्याला उघडं पडून द्यायचं नाही," असं आवाहनही मनोज जरांगे पाटलांनी केलं आहे.
दरम्यान, आमदार सुरेश धस हे महायुतीत असूनही राष्ट्रवादीचे नेते आणि मंत्री धनंजय मुंडे यांच्याविरोधात उघड भूमिका घेत आहेत. तसंच सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील आरोपींना कठोर शासन व्हावं, यासाठी प्रयत्न करत आहे. या पार्श्वभूमीवर आज जरांगे पाटील यांनी त्यांची स्तुती केल्याचं पाहायला मिळालं.