परभणी : शेतीची वाटणी करून देण्याच्या मागणीसाठी मुलाने आईवर विळ्याने वार करून तिला जखमी केल्याची घटना जिंतूर तालुक्यातील बामणी येथे २८ फेब्रुवारीला घडली. पार्वतीबाई उद्धवराव बाबरे असे जखमी झालेल्या दुर्दैवी मातेचे नाव आहे.
बामणी येथील पार्वतीबाई उद्धवराव बाबरे यांच्या पतीचे निधन झाले असून, त्यांना तीन मुले आहेत. लहान मुलगा जयकुमार हा शेतीची वाटणी करून दे, म्हणून नेहमीच त्यांना शिवीगाळ करून मारहाण करत असे. २८ फेब्रुवारीला सकाळी ११ वाजता पार्वतीबाई या सुनेसोबत शेतात काम करत असताना, त्यांना जयकुमार उर्फ बाळू हा तेथे आला व त्याने शेती वाटून दे नाही, तर हरभऱ्याचे पीक काढू नको, असे म्हणून त्यांना शिवीगाळ करू लागला. पार्वतीबाई यांनी शिवीगाळ करू नको, हरभऱ्याचे पीक काढणार नाही, असे सांगितले व त्या शेतातून बाहेर निघाल्या.
यावेळी जयकुमारने त्यांच्याच हातातील विळा घेऊन त्यांच्या उजव्या हातावर मारला. यात त्या जखमी झाल्या. उपस्थित नातेवाइकांनी सोडवासोडव केली. त्यानंतर, पार्वतीबाई बाबरे यांनी बामणी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यावरून आरोपी जयकुमार याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.