जिंतूर येथे दर मंगळवारी आठवडी बाजार भरतो. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील बाजार बंद करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी काढल्यानंतर तालुक्यातील आडगाव बाजार, बोरी या ठिकाणी बाजार भरल्यानंतर प्रशासनाने बोरी ग्रामपंचायतीला ५० हजार रुपये दंड ठोठावला, तर आडगाव ग्रामपंचायतीला कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली होती. याच धर्तीवर जिंतूरमध्ये मंगळवारी भरणारा बाजार भरणार नाही, असे वाटत असतानाच हा बाजार गणपती मंदिराजवळ भरण्याऐवजी नेहमीच्या भाजी मार्केटमध्ये भरवण्यात आला. विशेष म्हणजे या बाजारात दुकानदारांना बसण्यासाठी जागा मिळत नसल्याने अनेकांनी चक्क रस्त्यावर बाजार मांडला. दुसरीकडे चार दिवसांपूर्वी नगरपालिका प्रशासनाने भाजी मंडई, पशु वैद्यकीय दवाखान्यात व जिल्हा परिषद प्रशालेच्या प्रांगणात भरण्याबाबत तयारी करून घेतली होती. असे असतानाही भाजीविक्रेते मात्र कोणतेही सोशल डिस्टन्स न पाळता तसेच मास्कचा वापर न करता बाजारामध्ये गर्दी करत होते. त्यामुळे प्रशासन आता काय कारवाई करते याकडे लक्ष लागले आहे.
जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश डावलून जिंतुरात भरला आठवडी बाजार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 04, 2021 4:30 AM