देवगावफाटा : सेलू तालुका प्रशासनाकडून गतवर्षीची पाणीटंचाई दूर करण्यासाठी विहीर, बोअरचे अधिग्रहण करण्यात आले होते. मात्र, वर्षभराचा कालावधी उलटला असतानाही १७ शेतकऱ्यांच्या अधिग्रहणाचा तीन लाखांचा मोबदला अद्यापही थकीत आहे. त्यामुळे हे लाभार्थी शेतकरी वर्षभरापासून पंचायत समिती कार्यालयाकडे खेटे मारत आहेत.
सेलू तालुक्यात गतवर्षी पाणीटंचाईच्या झळा अनेक गावांना बसल्या होत्या. ही पाणीटंचाई दूर करण्यासाठी २०१९ मध्ये प्रशासनाने ८७ विहिरींचे अधिग्रहण करून १० टँकरद्वारे पाणीपुरवठा केला होता. मात्र, २०२० मध्ये पाणीटंचाई जाणवली नाही. त्यामुळे तालुक्यात टँकरने पाणीपुरवठा करण्याची वेळ प्रशासनावर आली नाही. मात्र, तहसील व पंचायत समिती प्रशासनाने तालुक्यात १० विहीर आणि ७ बोअर अधिग्रहण केले होते. हे अधिग्रहण महिनाभराच्या कालावधीसाठी ६०० रुपये रोज याप्रमाणे केवळ एक महिन्याचा अधिग्रहण मोबदला या शेतकऱ्यांना दिला जाणार आहे. वर्षभराचा कालावधी उलटला तरीही १७ शेतकऱ्यांना जवळपास तीन लाखांचा मोबदला अद्यापही मिळालेला नाही. त्यामुळे हे शेतकरी लाभार्थी मदतीच्या प्रतीक्षेत आहेत. त्यामुळे जिल्हा परिषेदच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष देऊन अधिग्रहण मोबदला द्यावा, अशी मागणी आहे.
या गावात केले होते अधिग्रहण
सेलू तालुक्यातील डिग्रस जहांगीर, पार्डी, कौसडी, तांदुवाडी, गव्हा, सिमणगाव, कन्हेरवाडी, हिस्सी, साळेगाव, खादगाव, डासाळा, कान्हड, नागठाणा, हट्टा या गावांमध्ये १७ शेतकऱ्यांचे विहीर व बोअरचे अधिग्रहण केले होते.
‘वरिष्ठ कार्यालयाकडून निधी उपलब्ध होत नसल्याने शेतकऱ्यांना त्यांच्या अधिग्रहण मोबदल्याची बिले अदा करण्यास विलंब होत आहे.’
- विष्णू मोरे, गटविकास अधिकारी पं. स. सेलू