पाथरी : विद्यार्थी संख्या कमी असल्याच्या कारणाने येथील जिल्हा परिषदेची मराठी माध्यमाची प्राथमिक कन्या शाळा हलविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसे आदेश गटशिक्षणाधिकाऱ्यांनी काढले आहेत.
पाथरी शहरातील जिल्हा परिषदेची मराठी माध्यमाची कन्या शाळा अत्यंत जुनी आहे. या शाळेत मागील काही वर्षापासून विद्यार्थी संख्या घटली आहे. सध्या केवळ १२ विद्यार्थी शाळेत शिक्षण घेत आहेत. शिक्षण विभागाने विद्यार्थ्यांची संख्या वाढविण्यासाठी प्रयत्नच केले नाहीत. त्यामुळेही शाळा विद्यार्थ्यांसह इतरत्र हलविण्याची वेळ शिक्षण विभागावर आली आहे. जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या तोंडी आदेशावरुन गटशिक्षणाधिकारी विश्वास खोगरे यांनी ही शाळा जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळेत विद्यार्थ्यांसह हलविण्याचे पत्र काढले आहे.
जि.प. केंद्रीय प्राथमिक शाळेत विद्यार्थी संख्या जास्त आहे. या ठिकाणी शिक्षकांच्या दोन जागा रिक्त आहेत. त्यामुळे कन्या शाळेतील दोन शिक्षक या शाळेला मिळतील, असा प्रयत्न शिक्षण विभागाकडून केला जात आहे. शिक्षण विभाग नियमबाह्य पद्धतीने कृती करीत असल्याच्या तक्रारी होत आहेत.
वरिष्ठांच्या आदेशानुसार कन्या शाळा विद्यार्थी कमी असल्याने तात्पुरत्या स्वरुपात केंद्रीय प्राथमिक शाळेत भरविण्याच्या सूचना दिल्या आहेत. अद्यापतरी ही शाळा दुसरीकडे भरविण्यात आली नाही. - मुकेश राठोड, शिक्षण विस्तार अधिकारी, पाथरी