परभणी : कोरोना कालावधीत साथरोग प्रतिबंधक कायद्याचे नियम मोडणाऱ्यांवर कारवाया करण्यात आल्या. यामध्ये २९९ जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. तसेच अनेकांकडून दंडाची रक्कमही वसूल करण्यात आली आहे. कोरोना सुरू झाल्यापासून अनेक नवीन शब्द, तसेच कायद्यातील वेगवेगळ्या तरतुदी नागरिकांच्या कानावर पडल्या. मात्र, कोणता नियम मोडल्यावर कोणती कारवाई होते, याची अनेकांना कल्पना नव्हती. अशाच प्रकारे कलम १८८ हा कोरोना काळात प्रचलित झाला. यामध्ये साथरोग प्रतिबंधक कायद्यामधील १८९७ च्या दिलेल्या आदेशाची पायमल्ली करणाऱ्यांविरुध्द पोलीस तसेच स्थानिक प्रशासनाने कारवाया केल्या. यात लॉकडाऊनमध्ये विनाकारण घराबाहेर फिरणे, गर्दी करणे, मास्कचा वापर न करणे यासह फिजिकल डिस्टन्सचा वापर न करणे या बाबींचा समावेश आहे. याबाबत जिल्हा प्रशासनाने वेळोवेळी आदेश पारित करून नागरिकांना नियमांचे पालन करण्यास सांगितले. मात्र, यातही अनेकांनी नियम न पाळल्याने त्यांच्यावर ही दंडात्मक कारवाई करण्यात आली. याच कलम १८८ बाबत नागरिकांसह युवकांमध्ये नेहमीच चर्चा रंगत आहेत. जिल्ह्यात गेल्या ६ महिन्यात २९९ जणांवर या कलमांतर्गत कारवाई करण्यात आली.
काय आहे कलम १८८...
शासनाने दिलेल्या वेगवेगळ्या आदेशांचा भंग केल्यास संबंधितावर साथरोग प्रतिबंधक कायद्याच्या १८९७ मधील दिलेल्या आदेशानुसार प्रतिबंधात्मक कारवाई केली जाते. यात गुन्हा दाखल होतो. न्यायालयात दोषी नसल्याचे सिध्द करावे लागते. यामध्ये किमान २०० रुपये दंड वसूल केला जातो.
जिल्ह्यात दाखल गुन्हे - २९९
प्रोहिबिशनच्या केसीस - ४७५
वाहने जप्त - ११५६
दंडवसुली - ८९ लाख १४ हजार १७३
काय होऊ शकते शिक्षा ?
या प्रकरणांमध्ये गुन्हा दाखल झाल्यास संबंधिताला २०० रुपये दंड लावला जातो. तसेच गुन्हा दाखल झाल्यानंतर स्वत:ला न्यायालयात दोषी नसल्याचे सिध्द करावे लागते.
जिल्ह्यातील उर्वरित केसीस (जाने. ते जून २०२१)
मास्क न घालता फिरणे - २० हजार २७१
दुकानांनी नियम मोेडल्याने केलेल्या कारवाया - ५३६
फिजिकल डिस्टन्स - ४९९
सार्वजनिक जागी थुंंकणे - १४
मोटार वाहन कायदा - १६ हजार ६४९