लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : विद्यार्थ्यांना चांगल्या दर्जाचे शिक्षण देणे हे शिक्षकांचे मुख्य कर्तव्य असताना त्यांना खिचडी शिजविणे, मुलांना वाटप करणे अशी अशैक्षणिक कामे देण्याची प्रशासकीय प्रक्रिया सुरूच आहे. त्यामुळे अध्यायन व अध्यापनाच्या कामावर परिणाम होत आहे.
शिक्षकांना अशैक्षणिक कामे देण्यात येऊन नये, असे आदेश राज्य शासनानेच वेळोवेळी काढले आहेत. तरीही प्रशासकीय पातळीवरून या आदेशाची अंमलबजावणी होताना दिसून येत नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांना चांगल्या दर्जाचे शिक्षण देण्याच्या प्रक्रियेत शिक्षकांना अडथळे येत आहेत. आपल्कालीन परिस्थितीतील कामे वगळता खिचडी शिजवून विद्यार्थ्यांना वाटप करण्यासारखी कामे बंद करण्याची मागणी होत आहे.
शिक्षण सोडून इतर कामांसाठीच प्रत्येक शाळेत किमान एक शिक्षक
शिक्षकांना विद्यार्थ्यांना शिकवण्याबरोबर अशैक्षणिक कामे करावी, लागतात, ही बाब गृहित धरून काही शाळांनी या कामांसाठी वेगळ्या शिक्षकांची नियुक्ती केली आहे; परंतु एक शिक्षकी शाळेतील शिक्षकांची अशा वेळी मोठी गोची होती. यासाठी शासनाने धोरणात्मक निर्णय घेण्याची आवश्यकता आहे.
जिल्ह्यातील जिल्हा परिषदेतील शाळांमध्ये स्वंयपाकी व मदतनीस यांची पटसंख्येनुसार खिचडी शिजवणे व विद्यार्थ्यांना करणे यासाठी नियुक्ती करण्यात आली आहे. आपत्कालीन परिस्थतील राष्टीय कामेच शिक्षकांना शासनाच्या आदेशानुसार देण्यात येतात. शासनाच्या आदेशाव्यतिरिक्त जिल्ह्यात शिक्षकांना इतर कसल्याही प्रकारची कामे देण्यात येत नाहीत. शासनाच्या आदेशाची जिल्ह्यात प्रभावी अंमलबजावणी करण्यात येते.
- सूचेता पाटेकर, शिक्षणाधिकारी