परभणी : जिल्ह्यामध्ये दोन वर्षांत ६० हजार ९२ महिलांनी बाळांना जन्म दिला आहे. मात्र, प्रधानमंत्री मातृवंदना योजनेंतर्गत केवळ २० हजार २७३ महिलांनाच पाच हजारांचा लाभ देण्यात आला आहे. त्यामुळे ३९ हजार ८१९ महिला या लाभापासून वंचित आहेत. त्यामुळे जवळपास ६७ टक्के महिला या योजनेपासून अनभिज्ञ असल्याचे दिसून येत आहे.
प्रधानमंत्री मातृवंदना योजनेंतर्गत गरोदरपणापासून ते बाळाच्या जन्मापर्यंत तीन टप्प्यांत पाच हजार रुपये महिलांना निधी दिला जातो. यासाठी १५० दिवसांच्या आत शासकीय आरोग्य संस्थेत नोंदणी करणे आवश्यक असते.
मात्र, दोन वर्षांत जिल्ह्यामध्ये खासगी रुग्णालयात ३० हजार ७१, तर शासकीय रुग्णालयात ३० हजार २६७ अशा एकूण ६० हजार ९२ महिलांनी बाळांना जन्म दिला आहे. मात्र, त्यातील केवळ २० हजार २७३ म्हणजे केवळ ३३ टक्के महिलांनाच या योजनेचा लाभ मिळाला आहे.
शासकीय रुग्णालयात प्रसूती, तरी लाभ नाही !
जिल्ह्यातील शासकीय रुग्णालयात जानेवारी २०१९ ते जानेवारी २०२१ या दोन वर्षांच्या काळात ३० हजार २६७ महिलांची प्रसूती झाली आहे. त्यामुळे या महिलांना प्रधानमंत्री मातृवंदना योजनेचा लाभ मिळणे आवश्यक होते. मात्र, शासकीय रुग्णालयात प्रसूती झाल्यानंतरही या महिलांना या योजनेचा लाभ देण्यात आला नाही. त्यामुळे शासकीय रुग्णालय प्रशासनच या योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी सकारात्मक नाही का? असा प्रश्न उपस्थित होत आहे.
नऊ कोटी १३ लाखांचे वाटप
प्रधानमंत्री माातृवंदना योजनेंतर्गत गरोदरपणापासून ते बाळाच्या जन्मापर्यंत तीन टप्प्यांत पाच हजार रुपये दिले जातात. यामध्ये २०१९ या वर्षात ११ हजार ५०१ मातांना पाच कोटी ३४ लाख ३७ हजार रुपयांचे वाटप करण्यात आले आहे, तर दुसरीकडे २०२० ते जानेवारी २०२१ या आर्थिक वर्षात आठ हजार ७८१ प्रसूती झालेल्या मातांना तीन कोटी ७९ लाख १७ हजारांचे वाटप करण्यात आले.
दोन वर्षांत २० हजार २७३ महिलांना नऊ कोटी १३ लाख ५४ हजार रुपयांचे वाटप करण्यात आले. त्यामुळे या महिलांना गरोदरपणात व प्रसूतीनंतर औषधोपचारासाठी हा पैसा कामी आला. त्यामुळे या योजनेची प्रभावी अंमलबजावणी गरजेची आहे.
लाभासाठी यांना साधा संपर्क
आशा स्वयंसेविका, अंगणवाडी सेविका, आरोग्य सेविका, आरोग्य उपकेंद्र, आरोग्य केंद्र, उपजिल्हा रुग्णालय, ग्रामीण रुग्णालय, वैद्यकीय अधीक्षक, तालुका आरोग्य अधिकारी यांच्या कार्यालयात संपर्क साधून लाभ घेता येतो.