परभणी बसस्थानकावर सुविधांचा अभाव
परभणी : येथील बसस्थानकावर प्रवाशांना सुविधा उपलब्ध होत नाहीत. त्यामुळे गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. पिण्याच्या पाण्यासह आसन व्यवस्था, सुरक्षेच्या दृष्टीने सीसीटीव्ही कॅमेरे या ठिकाणी उपलब्ध नसल्याने प्रवाशांत नाराजी व्यक्त केली जात आहे. अपुऱ्या जागेत बस उभ्या केल्या जात असून, बस शोधण्यासाठीही प्रवाशांना धावपळ करावी लागते.
गंगाखेड रस्त्यावरील पुलांची कामे करा
परभणी : येथील गंगाखेड रस्त्यावरील रस्त्याचे काम एका बाजूने जवळपास पूर्ण झाले आहे. या रस्त्यावरील पुलांची कामे अद्यापही पूर्ण झालेली नाहीत. त्यामुळे पुलांच्या ठिकाणी पर्यायी रस्त्याने प्रवास करावा लागतो. या मार्गावरील पुलाची कामेही त्वरित पूर्ण केल्यास वाहनधारकांची गैरसोय दूर होणार आहे.
जिल्ह्यात वाढल्या विजेच्या समस्या
परभणी : जिल्ह्यात विजेच्या समस्या वाढल्या आहेत. नियमित दुरुस्ती होत असल्याने ग्राहकांना खंडित वीजपुरवठ्याचा सामना करावा लागत आहे. ग्रामीण भागात अनेक गावांमध्ये वीज तारा जीर्ण झाल्या असून, त्याचा धोका निर्माण झाला आहे. काही भागात विजेचे पोल वाकलेले आहेत. रोहित्र जळाल्यानंतर ते वेळेत दुरुस्त होत नाही. तेव्हा विजेच्या समस्यांचे तातडीने निराकरण करावे, अशी मागणी होत आहे.
सुपर मार्केट रस्त्यावर वाढली धूळ
परभणी : येथील राजगोपालाचारी उद्यानापासून ते सुपरमार्केटपर्यंतच्या रस्त्यावर मनपाने जलवाहिनीसाठी एका बाजूने रस्ता खोदला होता. मात्र खोदकाम केलेल्या जागेवर मुरुम तसाच पडून आहे. या मार्गावरील वाहतुकीमुळे धूळ उडून त्याचा त्रास वाहनधारकांना सहन करावा लागत आहे. मनपाने या रस्त्यावर पसरलेला मुरुम उचलून घ्यावा, अशी नागरिकांची मागणी आहे.
शहरातील उद्यानातील खेळण्यांची दुरवस्था
परभणी : शहरातील राजगोपालाचारी उद्यानातील खेळण्यांची दुरवस्था झाली आहे. घसरगुंडी, सी-सॉ, मेरी गो राऊंड या खेळण्या जागोजागी तुटल्या आहेत. त्यामुळे मुलांना इजा पोहोचण्याची भीती निर्माण झाली आहे. तेव्हा मनपा प्रशासनाने खेळण्यांची दुरुस्ती करावी, अशी मागणी होत आहे.
ग्रामीण बसफेऱ्या सुरू करण्याची मागणी
परभणी : जिल्ह्यात अनलॉकची प्रक्रिया राबविली जात असताना एस.टी. महामंडळाने मात्र अद्यापपर्यंत ग्रामीण भागात बसफेऱ्या सुरू केल्या नाहीत. त्यामुळे ग्रामस्थांना नाईलाजास्तव खासगी वाहनाने तालुक्याचे किंवा जिल्ह्याचे ठिकाण गाठावे लागते. ग्रामीण मार्गावर उत्पन्न मिळत नसल्याचे कारण देत या बससेवा सुरू केल्या नाहीत.