परभणी : घरच्या आर्थिक परिस्थितीमुळे तसेच रोजीरोटीचा प्रश्न असल्याने शिक्षणाच्या वयात अनेक बालकांना पाटी-पेन्सिल हातात धरण्याएेवजी भिक्षा मागावी लागत आहे. शहरातील सार्वजनिक ठिकाणांवर बालभिक्षेकरी तसेच बालकामगारांचे प्रमाण वाढले आहे.
कोरोनाच्या कालावधीत लॉकडाऊनमुळे शहरातील बालभिक्षेकऱ्यांचे प्रमाण पूर्णत: कमी झाले होते. यानंतर अनलॉक होताच शहरात ठिकठिकाणी बालभिक्षेकरी दिसून येत आहेत. यात रेल्वेस्थानक, स्थानक तसेच जिल्हा रुग्णालय, विविध मंदिर, बाजारपेठेतील मुख्य चौकांमध्ये सकाळपासून ते सायंकाळपर्यंत बालभिक्षेकरी फिरून स्वत: तसेच काहीजण परिवारातील सदस्यांसोबत भिक्षा मागतात. यामुळे त्यांच्यावर शिक्षणाच्या वयात काम करण्याची वेळ आली आहे. पोलीस तसेच बालविकास अधिकारी, कामगार कार्यालय आणि अन्य सरकारी विभागांनी यात पुढाकार घेऊन काम करणाऱ्या तसेच भिक्षा मागणाऱ्या बालकांचा सर्व्हे करून त्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणणे गरजेचे आहे.
रेल्वे स्थानक
रविवारी सकाळी तसेच दुपारच्या वेळी स्थानकाच्या आत रेल्वेमध्ये आणि स्थानकावर काही ठिकाणी बालभिक्षेकरी आढळून आले. यांतील एक ते दोन कुटुंबे त्यांच्या पालकांना घेऊन भिक्षा मागत होती. ५ ते ६ बालके या परिसरात दिसून आली.
बसस्थानक
सर्वाधिक बालभिक्षेकरी यांचे प्रमाण या परिसरात दिसून आले. बसस्थानकाच्या बाहेरील रस्त्यावर असलेल्या विविध दुकानांमध्ये बालकामगार असल्याचे दिसून आले. बस येताच तसेच बाहेर प्रवासी पडताना अनेक बालभिक्षेकरी काहींना अडवून पैशाची तसेच खाद्यपदार्थांची मागणी करीत होते.
अंदाजे ५० मुले-मुली समितीकडे सुपुर्द
बालकल्याण समितीकडे कोरोनापूर्वी मागील २ ते ३ वर्षांत चाईल्डलाईन व अन्य विभागांनी सर्वे करून अंदाजे ५० मुले-मुली बाल कल्याण समितीकडे सुपुर्द करण्यात आली आहेत. सध्या विविध शासकीय विभागांनी एकत्र येत सर्वेक्षण केल्यास बाल भिक्षेकरी तसेच बालकामगार सापडण्यास मदत होऊ शकेल.