गंगाखेड (परभणी ) : महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या मार्ग तपासणी पथकाने एसटीतील प्रवाश्यांची तपासणी केली असता तिकीटामध्ये १० रुपयाची तफावत काढताच वाहक चक्कर येऊन कोसळला. हृद्य गती वाढून अस्वस्थ झालेल्या वाहकावर उपजिल्हा रुग्णालयात उपचार करण्यात आले. ही घटना शनिवारी (दि. १७) सकाळी ७.३० वाजेच्या सुमारास तालुक्यातील मरडसगाव पाटीवर घडली. वाहकाने दहा रुपयांच्या तिकिटाचा अपहार केल्याचा ठपका मार्ग तपासणी पथकाने ठेवला आहे.
गंगाखेड आगारातील धनेवाडी- गंगाखेड (क्रमांक एमएच ०७ सी ७२४७ ) ही बस सकाळी धनेवाडी येथुन गंगाखेडकडे येत असतांना मार्ग तपासणी पथकातील सहायक वाहतुक निरीक्षक शरद बी. पाटील, आर.जी. शिंदे, वाहतुक नियंत्रक धनजकर, कदम आदींनी शनिवारी ७.३० वाजेच्या सुमारास मरडसगाव पाटीवर बसमधून उतरणाऱ्या व आतील प्रवाशांजवळील तिकिटांची तपासणी केली. यावेळी मरडसगाव पाटीपर्यंत प्रवास करणाऱ्या काही प्रवाशांपैकी एका प्रवाशाजवळ तिकीट आढळून आले नाही. त्या प्रवाशांचा जवाब घेतल्यानंतर त्यांनी वाहकाला दोन फुल व एक हाफ तिकिटाचे पैसे दिल्याचे सांगितले तेंव्हा वाहकाने दहा रुपयांचा अपहार केल्याचे निदर्शनास आले.
यावरून पथकाने वाहक बालाजी संभाजी सावंत यांना विचारणा केली असता पैसे घेतल्याचे सांगत नजरचुकीने हा प्रकार घडल्याचे सांगितले. यानंतर अचानक वाहकाला चक्कर आली व ते खाली कोसळले. पथकातील कर्मचाऱ्यांनी बस थेट गंगाखेड येथील उपजिल्हा रुग्णालयात नेत उपचारासाठी दाखल केले. निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. रेश्मा गौस, अधिपरिचारिका निता देशमुख, प्रशांत राठोड यांनी त्यांच्यावर प्रथमोपचार केले. मात्र वाहक सावंत यांच्या हृदयाचे ठोके वाढल्याने त्यांना शहरातील खाजगी रुग्णालयात हलविण्यात आले. स्थानक प्रमुख रामेश्वर हडबे, सहायक वाहतुक नियंत्रक माऊली मुंडे व वाहकांनी रुग्णालयात धाव घेतल्याने रुग्णालय परिसरात मोठी गर्दी झाली होती.
कार्यवाहीचा प्रस्ताव वरिष्ठांकडे सादरदरम्यान, तपासणीत आढळलेल्या अपहाराचा अहवाल पुढील कार्यवाहीसाठी वरिष्ठांकडे सादर केला असल्याचे मार्ग तपासणी पथकातील शरद पाटील, आर. जी. शिंदे यांनी सांगितले.