- मारोती जुंबडे
परभणी : १३ कोटी रुपये खर्च करून अद्ययावत असे बसपोर्ट उभारण्यासाठी राज्य शासनाने मंजुरी दिली खरी; परंतु, कंत्राटदाराने केलेल्या कामाचा मोबदला मिळाला नसल्याने शुक्रवारपासून बसपोर्टचे काम बंद पडले आहे. त्यामुळे परभणीकरांचे बसपोर्टचे स्वप्न कागदावरच राहते की काय, अशी शंका निर्माण होत आहे.
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या परभणी येथील बसस्थानकाचे रुपांतर अद्ययावत अशा बसपोर्टमध्ये करण्यासाठी तत्कालीन परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी १३ कोटी ४ लाख ४८ हजार ६०० रुपयांचा निधी मंजूर केला. परभणी बसस्थानकाची सातत्याने दुरवस्था होत असल्याने या बसस्थानकाचे अद्ययावतीकरण करण्याची संकल्पना रावते यांनी मांडली होती. त्यासाठी आ. डॉ. राहुल पाटील यांनी सातत्याने पाठपुरावा करून बसपोर्ट मंजूर करून घेतले. सुविधांनी युक्त असे बसपोर्ट परभणीच्या सौंदर्यात भर घालणारे ठरणार आहे. मात्र कधी निविदा प्रक्रिया तर कधी तांत्रिक कारणामुळे या बसपोर्टचे काम रखडले आहे.
विशेष म्हणजे, २०१७-१८ या वर्षात बसपोर्टच्या कामाला मंजुरी मिळाली आहे. मात्र तांत्रिक अडचणी अडथळा ठरत आहेत. अडथळ्यांची शर्यत पार करून या बसपोर्टचे काम विश्वशक्ती कंन्ट्रक्शनने १ मार्च २०१९ पासून सुरू केले. मात्र बसस्थानकामध्ये असलेले उपहारगृह अडथळा ठरत होते. ते पाडण्यासाठी १५ जून २०२० आदेश मिळाले. या सर्व गोष्टी पूर्ण करून विश्वशक्ती कंन्स्ट्रक्शनने हे काम सुरू केले आहे. मात्र १५ ऑगस्ट २०२० रोजी सुरू असलेल्या कामाचा पहिला हप्ता ३० लाख रुपये मिळणे अपेक्षित होते. मात्र अद्यापही महामंडळाने दिलेले नाही. मात्र हे काम सुरूच ठेवले होते. त्यानंतर १० ऑक्टोबरपर्यंत दुसरा हप्ता म्हणजे ६० लाख रुपयांची रक्कम एसटी महामंडळ प्रशासनाकडून देणे अपेक्षित आहे. मात्र ही रक्कमी मिळाली नाही. या संदर्भात विभागीय अभियंत्यांकडे विश्वशक्ती कंन्स्ट्रक्शनने दोन वेळा पत्र व्यवहार केला आहे. मात्र अद्यापही रक्कम मिळाली नसल्याने बसपोर्टचे काम कंत्राटदाराने बंद केले आहे.
अशी आहे बसपोर्टची रचनापरभणी येथील बसस्थानक परिसरात अद्ययावत बसपोर्ट उभारले जाणार आहे. एकूण १८ फलाटांची निर्मिती केली जाणार आहे. त्यात १३ आयडीयल फलांटांचा समावेश आहे. १३०० चौरस मीटर जागेवर बसपोर्ट उभारण्यात येणार असून, दोन्ही मजल्याचे क्षेत्रफळ ३ हजार ६४४ चौरस मीटर एवढे आहे.