सेलू (जि. परभणी) : सेलू शहरातील दोन १७ वर्षीय मुलींचे नियोजित बालविवाह रोखण्याची कारवाई प्रशासनाने मंगळवारी सकाळी ९ वा. केली.
सेलूत दोन १७ वर्षीय मुलीचे बालविवाह होणार असल्याची तक्रार १०९८ या चाईल्ड लाईनवर प्राप्त झाली होती. जिल्हा महिला बालविकास अधिकारी कैलास तिडके यांनी त्यांचा एक प्रतिनिधी संबंधित वधुपित्यांना समजावून सांगण्यासाठी सेलू शहरात १ मे रोजी रात्री पाठवला होता. पण उलट या प्रतिनिधीस धमकावण्याचा प्रकार समोर आला.
ही बाब उपविभागीय अधिकारी संगेवार यांच्या निदर्शनास आणून दिली. त्यानंतर अरुणा संगेवार, पोलीस निरीक्षक रावसाहेब गाडेवाड, न.प. मुख्याधिकारी देविदास जाधव, जिल्हा चाईल्ड लाईनचे समन्वयक संदिप बेंडसुरे, जिल्हा संरक्षण कक्षाच्या आम्रपाली पाचपुते, पोउपनी साईनाथ पुयड, पोलीस हवलदार अस्मिता मोरे, तलाठी एम. ए. आष्टीकर, न.प. अधिक्षक मल्लिकार्जुन स्वामी यांचे पथक २ मे रोजी सकाळी ९ वा. सेलू शहरातील विवाह होणाऱ्या स्थळी दाखल झाले.
त्यांनी ३ मे रोजी व २१ मे रोजी होणार असलेल्या बालविवाहातील वधु पित्यांना बोलवून घेऊन पंचासमक्ष त्यांना समजावून सांगत प्रबोधन केले. यानंतर या दोन्ही वधुपित्यांनी हा बालविवाह रद्द करत असल्याचे मान्य केले व मुलीचे १८ वर्ष पुर्ण झाल्यानंतर विवाह करू असे सांगितले तसा पंचासमक्ष पंचनामा प्रशासनाकडून करण्यात आला. या कारवाई मुळे शहरात बालविवाह प्रकरणी धास्ती निर्माण झाली.
बालविवाह झाल्याचा प्रकार पुढे आला...सेलूत होणारे दोन बालविवाह रोखण्यासाठी आलेल्या पथकाला ३० एप्रिलला एक बालविवाह झाल्याचा प्रकार समजला. याबाबत माहिती घेत असून त्यानंतर याप्रकरणी गुन्हा दाखल केला जाईल अशी माहिती उपविभागीय अधिकारी संगेवार यांनी दिली आहे.