- विठ्ठल भिसेपाथरी ( परभणी): विद्यार्थी आणि शिक्षकांचे यांचे नाते घट्ट असते. विद्यार्थ्यांचा अधिक वेळ शिक्षकांच्या सहवासातच जातो. त्यामुळे शिक्षणाची गोडी निर्माण करणाऱ्या शिस्तप्रिय शिक्षक आणि विद्यार्थ्यांमध्ये एक जिव्हाळा निर्माण होतो. तालुक्यातील मुदगल येथील शिक्षक दिलीप माने यांची बदली झाल्याने त्यांना निरोप देताना विद्यार्थ्यांना गहिवरून आले. तर शिक्षक माने यांना देखील अश्रू अनावर झाले.
पाथरी तालुक्यातील मुदगल येथील सहशिक्षक दिलीप माने हे विद्यार्थी प्रिय शिक्षक आहेत. विद्यार्थ्यांसोबत त्यांचा चांगलाच लळा होता. मागील साडे तीन वर्षांपासून ते मुदगल येथे कार्यरत होते. मात्र, नुकतीच त्यांची बदली गंगाखेड तालुक्यातील साखरवाडी येथे झाली आहे. विद्यार्थी नेहमी प्रमाणे शाळेत आल्यानंतर त्यांना माने सरांची बदली झाल्याची माहिती मिळाली. आज आपल्या सरांना निरोप दिला जाणार, आपले आवडीचे शिक्षक शाळा सोडून जाणार या भावनेने विद्यार्थी अस्वस्थ झाले. शिक्षक माने शाळेतून निघत असताना विद्यार्थी गहिवरले. हे पाहून शिक्षक माने देखील अश्रू रोखू शकले नाही. हळव्या झालेल्या विद्यार्थ्यांना समजावत ग्रामस्थांनी अखेर शिक्षक माने यांना निरोप दिला.