- प्रमोद साळवेगंगाखेड : तालुक्यातील मसला व झोला गावच्या गोदावरी नदीतील वाळू चोरीसाठी वापरण्यात येणारे दोन तराफे गुरुवारी महसूल व पोलीस यंत्रणेच्या कारवाईत जाळण्यात आले. विशेष म्हणजे वाळू माफीयांचे अधिराज्य संपविण्यासाठी महिला तहसीलदार उषाकिरण शृंगारे यांनी स्वतः गंगेत उतरून तराफे ताब्यात घेतले. मात्र सलग पाचव्या कारवाईतही पथक गावात पोहोचण्यापूर्वीच माफिया पसार होण्यात यशस्वी झाल्याने वाळू माफीयांना नेमके बळ कुणाचे हा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.
गुरुवारी तालुक्यातील मसला व झोला येथे महसूल व पोलिसांनी एकत्रित कारवाई केली. यावेळी अधिकारी कर्मचाऱ्यांची दोन पथकात विभागणी करण्यात आली. यात तहसीलदार उषाकिरण शृंगारे, सपोनि.शिवाजी सिंगनवाड, नायब तहसलदार अशोक केंद्रे, मंडळाधिकारी शंकर राठोड, गणेश सोडगीर, सुदीप चोरघडे, जमादार बालाजी साळवे, नरसिंह चाटे, संजय जाधव, संतोष भारसाखरे, सुरेश भालेराव, सुनील कांबळे, संतोष इप्पर, गणेश जटाळ, हरीश पवार, सुग्रीव जाधव आदींचा समावेश होता. यावेळी दोन्ही पथकांनी मसला व झोला येथे दोन तराफे ताब्यात घेत जाळून नष्ट केली.
अशी माफक अपेक्षातालुक्यातील गोदाकाठच्या काही भागात सुरू असलेला अवैध वाळू उपसा रोखण्यासाठी महसूलसह पोलीस यंत्रणा अहो रात्र काम करत आहे. हा विषय केवळ सरकार स्तरावरचा नसून गाव पातळीवरील लोकांनीही वाळू माफीयांना प्रत्यक्ष अप्रत्यक्ष सहकार्याची भूमिका ठेवू नये अशी माफक अपेक्षा पथकाने व्यक्त केली.
वाळू माफीयांना माफी नाहीसरकारी मालमत्तेचे जपवणूक करण्यासाठी माफीयांना रान मोकळे होऊ देणार नाही. यापुढेही कारवाया होतच राहतील, वाळू माफीयांना कुठल्याच परिस्थितीत माफी मिळणार नाही. - उषाकिरण शृंगारे,तहसीलदार