राजन मंगरुळकर
परभणी : शहर परिसरात रविवारी सकाळी किमान तापमानात चांगलीच घट झाली. शनिवारपेक्षा रविवारी किमान तापमान पाच अंशांनी कमी नोंद झाले. परिणामी, परभणीकर वाढत्या थंडीने गारठल्याचे चित्र पहावयास मिळाले. शहराचे किमान तापमान रविवारी नऊ अंश सेल्सिअस एवढे नोंद झाले. शनिवारी किमान तापमान १४ अंश एवढे होते. गेल्या चार दिवसांपासून शहर परिसरात धूक्याची चादर दररोज सकाळी पसरत आहे. त्यामुळे जनजीवनावर सुद्धा परिणाम झाला आहे.
गेल्या तीन ते चार दिवसांमध्ये तापमानात सातत्याने घट होत आहे. डिसेंबर महिन्यात १० तारखेला सर्वाधिक कमी तापमान ८.५ अंश नोंद झाले होते. त्यानंतर पुन्हा सातत्याने तापमानात वाढ झाली. जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात तापमानात घट होत असल्याने परभणीकरांना बोचऱ्या थंडीचा अनुभव मिळत आहे.असे होते आठवड्याभराचे किमान तापमान
सोमवार १२.५मंगळवार १४.८बुधवार १५.७गुरुवार १६.२शूक्रवार १५.३शनिवार १४.०रविवार ९.०
असा वर्तविला आहे मराठवाड्यात अंदाज
प्रादेशिक हवामान केंद्र, मुंबईच्या शुक्रवारच्या अंदाजानुसार मराठवाडा विभागामध्ये पुढील ४ ते ५ दिवसात किमान तापमानात हळूहळू २ ते ४ अंशाने घट होण्याची शक्यता आहे. किमान तापमानात घट होण्याची शक्यता लक्षात घेता शेतकऱ्यांनी पिकास, फळबागेस, भाजीपाला पिकास हलके पाणी द्यावे. १२ जानेवारीदरम्यान किमान तापमान सरासरीपेक्षा कमी तर १३ ते १९ जानेवारी दरम्यान किमान तापमान सरासरीपेक्षा कमी राहण्याची शक्यता आहे. सॅक, इसरो अहमदाबाद यांच्या उपग्रहाच्या बाष्पोत्सर्जनाच्या जिल्हानिहाय व तालूकानिहाय छायाचित्रानूसार बाष्पोत्सर्जनाचा वेग किंचित कमी झाला आहे तर जमिनीतील ओलाव्याचे प्रमाण कमी झाले आहे. काही दिवसांपासून किड व रोगाचा प्रादूर्भाव वाढल्यामूळे सामान्य वनस्पती निर्देशांक कमी झाला आहे. या करीता शेतकऱ्यांनी पिकांचे किड व रोगापासून संरक्षण करावे.