शहरात राष्ट्रीय महामार्ग तसेच मुख्य बाजारपेठेतील रस्त्यांवर वाहतुकीचे नियम अनेक वाहनधारक सर्रासपणे मोडतात. यात युवकांचे प्रमाण सर्वाधिक आहे. नियम माहीत असूनही दंड भरून किंवा ओळखीने वाहन सुटते, या भावनेतून नियम पाळायचाच नाही, अशी स्थिती शहरात दिसून येते. मात्र, वाहतूक पोलिसांकडून मागील ७ महिन्यांत नियम मोडणाऱ्यांची गय केली जात नसल्याचे दिसून येत आहे. जानेवारी ते ऑगस्ट या कालावधीत शहरात विविध गुन्ह्यांत वाहनधारकांनी नियम मोडल्यामुळे ३ हजार ७०५ केसीस करण्यात आल्या आहेत. ही कारवाई सुरूच असल्याने नियम पाळून वाहन चालविल्यास दंड भरण्याची वेळ वाहनधारकांवर येणार नाही.
तर असा लागतो दंड...
विना हेल्मेट - ५०० रुपये
ट्रिपल सीट - २०० रुपये
मोबाईलवर बोलणे - ५०० रुपये
विरुध्द दिशेने वाहन नेणे - २०० रुपये
आवाज करणारे सायलेन्सर लावणे - १ हजार रुपये
अवैध प्रवासी वाहतूक - ५ ते १० हजार रुपये
दुचाकी वाहनचालकांनो, हे नियम पाळा...
मोबाईलवर बोलताना वाहन चालवू नये
राँग साईड वाहने नेऊन होणारे अपघात टाळावेत
ट्रिपल सीट वाहन चालवू नये
वाहनाचे सायलेन्सर फोडून ध्वनि प्रदूषण होईल असे वाहन वापरू नये
नियम पाळून पोलिसांना सहकार्य करावे, अन्यथा दंड भरावा
सर्वाधिक प्रमाण राँग साईड, ट्रिपल सीटचे
परभणी शहरात वाहतुकीचे नियम सर्रासपणे मोडले जातात. मात्र, यात ट्रिपल सीट वाहन चालविणे, राँग साईड प्रवेश करणे, मोबाईलवर बोलताना वाहन चालविणे व अवैध प्रवासी वाहतूक करणे यांचे प्रमाण अधिक आहे. या ४ प्रकारांमध्ये केसीस जास्त प्रमाणात दाखल होतात.
किती जणांवर झाली कारवाई...
जानेवारी ते ऑगस्ट २०२१ या कालावधीत शहरात ३ हजार ७०५ वाहनधारकांवर केसीस दाखल करण्यात आल्या. यामध्ये ७ लाख ४१ हजार रुपयांचा दंड वाहतूक शाखेने वसूल केला. मागील १ महिन्यापासून शहरात वाहतूक शाखेने दोन विशेष पथके कार्यान्वित केली आहेत. या पथकांद्वारे पेट्रोलिंग करून राष्ट्रीय महामार्गावरील तसेच मोबाईलवर बोलणाऱ्या व ट्रिपल सीट वाहन चालविणाऱ्यांवर कारवाई केली जात आहे. पोलिसांचे पथक रात्री ११ वाजेपर्यंत शहरातील मुख्य चौकांमध्ये कार्यरत राहून, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई करीत आहे.