गंगाखेड (जि. परभणी) : वाळू उपसा करण्यास अडथळा का आणतोस, असे म्हणत वाळूमाफियांनी एका ३३ वर्षीय युवकास बेदम मारहाण करून त्याचा खून केल्याची घटना पालम तालुक्यातील रावराजूर येथील वाळूपट्ट्यात घडली. याप्रकरणी गंगाखेड पोलीस ठाण्यात मंगळवारी पहाटे २ वाजता ८ आरोपीविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
रावराजूर येथील माधव त्र्यंबकराव शिंदे (३३) या युवकास २४ मार्च रोजी रात्री १०:३० वाजता काही वाळूमाफियांनी दुचाकीवर बसवून गोदावरी नदीतील वाळूधक्क्यावर आणले. या ठिकाणी वाळू उपसा करण्यास अडथळा का आणतो, या वाळूसाठी पैसे भरावे लागतात, असे म्हणत दगड व लोखंडी रॉडने जबर मारहाण केली. त्यानंतर गंभीर जखमी अवस्थेत नांदेड येथील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. उपचार सुरू असताना २५ मार्च रोजी माधव शिंदे यांचा मृत्यू झाला. त्यानंतर वाळूधक्का मालक प्रकाश प्रभू डोंगरे (रा. धनेवाडी, ता. गंगाखेड) याने मृताच्या चुलत्यास माधव शिंदे सिरियस आहे, असे सांगितले. त्यानंतर माधवच्या नातेवाईकांनी नांदेड येथील खासगी दवाखान्याकडे धाव घेतली. मात्र तोपर्यंत माधवचा मृत्यू झाला होता. या घटनेनंतर माधवचे नातेवाईक आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यास पुढे येत नव्हते. त्यानंतर २८ मार्च रोजी पोलीस अधीक्षक जयंत मीना स्वत: दुपारी २ वाजल्यापासून ते रात्री १२ वाजेपर्यंत गंगाखेड ठाण्यात ठाण मांडून बसले. त्यानंतर रावराजूर येथील फिर्यादी श्रावण रामेश्वर शिंदे (मृताचा नातेवाईक) हे गुन्हा दाखल करण्यासाठी पुढे आले. त्यानंतर श्रावण शिंदे यांच्या फिर्यादीवरून आठ वाळूमाफियांवर घटनेच्या ७२ तासानंतर प्रकाश प्रभू डोगरे (रा. धनेवाडी ता. गंगाखेड), सुरेश उत्तमराव शिदे, ओमप्रकाश ज्ञानोबा शिदे, संदीप लक्ष्मण शिदे, भागवत शिदे, सर्जेराव शिदे (रा. रावराजूर ता. पालम), नितीन खंदारे (गोपा ता. गंगाखेड) यांच्यावर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, या घटनेने पालम, गंगाखेड तालुक्यात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
रात्रीच्या वाळू उपशास विरोध केल्यानेच संपविलेमृत माधव शिंदे यांच्या आई रावराजूर ग्रामपंचायतीच्या सदस्य आहेत. त्यामुळे माधव हे सदरील वाळूधक्क्यातून रात्री वाळू उपसा करण्यास विरोध करीत होते. ज्या रात्री शिंदे यांचा खून झाला त्या रात्रीही त्यांनी रात्री नियमानुसार वाळू उपसा व वाहतूक करता येत नाही. वाळू उपसा बंद करा, म्हणून विरोध केला होता.