कोरोनामुळे यावर्षी दहावीचा निकाल जवळपास दीड महिना उशिराने लागला. त्यानंतर आता अकरावीच्या प्रवेशासाठी विद्यार्थी व पालक कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये ये-जा करताना दिसून येत आहेत. यामुळे या कनिष्ठ महाविद्यालय परिसरात सध्या रेलचेल वाढल्याचे पहावयास मिळत आहे. असे असले तरी शहराच्या तुलनेत ग्रामीण भागातील कनिष्ठ महाविद्यालयांत अकरावीला प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या अधिक दिसून येत आहे. काही ग्रामीण भागातील कनिष्ठ महाविद्यालयांचे प्रवेश आठ दिवसांच्या आतच फुल्ल झाले आहेत. दुसरीकडे शहरातील कनिष्ठ महाविद्यालयांना विद्यार्थ्यांची प्रतीक्षा दिसून येत आहे.
अकरावीसाठी गावात प्रवेश का?
कोरोनामुळे शहरी भागात आपल्या पाल्याला शिक्षणासाठी पाठवण्यास पालक तयार नाहीत. त्यामुळे ते ग्रामीण भागात प्रवेश घेण्यास प्राधान्य देत आहेत. शिवाय शहरी भागात शिक्षणासाठी राहण्याचा खर्च कोरोनाकाळात परवडत नसल्यानेही अनेकांनी शहरात जाणे टाळले आहे.
ग्रामीण भागात सर्व अभ्यासक्रम उपलब्ध आहेत. महाविद्यालयही गावाजवळच असल्याने जाण्या-येण्यासाठी सोपे होते, शिवाय खर्चात बचत होते. अकरावीसाठी गावाजवळ असलेल्या ग्रामीण भागातील कनिष्ठ महाविद्यालयात प्रवेश घेतला आहे.
- किरण मुळे, नैकोटा, ता. सोनपेठ
कोविडमुळे विद्यार्थी शहरात जाण्यास तयार नाहीत. गावात राहूनच त्यांना शिक्षण घ्यायचे आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांचा ग्रामीण भागाकडे कल वाढला आहे. आमच्याकडे सर्व प्रवेश फुल्ल झाले आहेत.
- श्रीरंग राठोड, शारदा कनिष्ठ महाविद्यालय, आडगाव बाजार
वैद्यकीय प्रवेशातील प्रादेशिक आरक्षण असलेली ७०-३० टक्के प्रवेशप्रक्रिया रद्द झाल्याचा परिणाम दिसून येत आहे. त्यामुळे शहरात जाणारे विद्यार्थी गावातच अकरावीला प्रवेश घेत आहेत. त्यामुळे शहराऐवजी ग्रामीण भागात प्रवेशासाठी विद्यार्थ्यांचा ओढा वाढला आहे.
- भगवानराव वटाणे, संत तुकाराम कनिष्ठ महाविद्यालय, धानोरा बु.
ग्रामीण भागातही चांगले कॉलेजेस उपलब्ध झाले आहेत तसेच घराजवळ कॉलेज असल्याने अनावश्यक खर्च वाचतो. त्यामुळे शहरात प्रवेश न घेता ग्रामीण भागातील महाविद्यालयात प्रवेश घेतला आहे.
- सय्यद युनूस सय्यद शफी, महातपुरी, ता. गंगाखेड