गंगाखेड: उमेदवाराला मत का दिले नाही ? असा जाब विचारत एकाला जबर मारहाण केल्याची घटना सोमवारी ( दि. १८ ) सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास तालुक्यातील गुंजेगाव येथे घडली आहे. रावसाहेब रंगनाथ मोटे असे जखमीचे नाव आहे. त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून प्रकाश सोपान धुळगुंडे, अंगद बाबाराव मोटे, माधव संतराम इमडे व माधव मुंजाजी इमडे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तालुक्यातील ग्राम पंचायत निवडणुकीचा निकाल सोमवारी जाहीर झाला. निकालानंतर सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास गुंजेगाव येथील रावसाहेब रंगनाथ मोटे हे त्यांच्या शेत आखाड्यावर काम करत होते. यावेळी गावातील प्रकाश सोपान धुळगुंडे, अंगद बाबाराव मोटे, माधव संतराम इमडे व माधव मुंजाजी इमडे तिथे दाखल झाले. त्यांनी मत का दिले नाही ? असा जाब मोटे यांना विचारला. त्यानंतर मोटे यांना शिवीगाळ करत यांनी मारहाण करत जिवे मारण्याची धमकी दिली.
रावसाहेब मोटे यांनी सोमवारी रात्री पिंपळदरी पोलीस ठाण्यात याप्रकरणी तक्रार दाखल केली. प्रकाश सोपान धुळगुंडे, अंगद बाबाराव मोटे, माधव संतराम इमडे व माधव मुंजाजी इमडे यांच्या विरोधात अदखल पात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याचा तपास जमादार प्रदीप सपकाळ हे करीत आहेत. ग्रामपंचायत निवडणुकी दरम्यान हेव्यादाव्यातुन गावात कुरबुऱ्या वाढल्या आहेत. निवडणूक शांततेत पार पडली मात्र निकालावरून वाद उद्भवत असल्याचे चित्र आहे. यामुळे निवडणुकी दरम्यानचे हेवेदावे विसरून ग्रामस्थांनी एकोप्याने राहण्याचे आवाहन पोलीस प्रशासनाने केले आहे.