परभणी : सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत केलेल्या प्रत्येक व्यवहारातून शासनाला कराच्या स्वरूपात प्रत्येक जण काही तरी रक्कम देत असतो. स्वत:ची आर्थिक परिस्थिती असो अथवा नसो कर मात्र वसूल होतो. त्यामुळे पर्यायाने महागाईत भर पडते. त्यामुळे आधीच पोट भरण्याची मारामार, मग कर कशासाठी अशी भावना सर्वसामान्य नागरिकांत निर्माण होत आहे.
कोरोनाच्या संकटाने जिल्ह्याची आर्थिक परिस्थिती खालावली आहे. रोजगाराचा प्रश्न गंभीर झाला आहे. अनेकांचे रोजगार गेले, अशा परिस्थितीत महिनाभराचा खर्च भागविणे अवघड असताना प्रत्येक गोष्टीतून मात्र एक ते दोन रुपयांचा कर शासनाकडे अदा होतो.
किराणा साहित्य, मोबाईलचे बिल, लाईट बिल, इलेक्ट्रॉनिक्स वस्तू, मोबाईल खरेदी या सर्व वस्तू आणि व्यवहारांवर शासनाचा ठराविक कर लावलेला आहे. त्यामुळे एक व्यवहार झाला की शासनाकडे कराच्या स्वरुपात रक्कम वर्ग होते. याच करांमुळे महागाईतही वाढ झाली आहे. त्यामुळे आर्थिक परिस्थिती कशीही असो प्रत्येक जणाकडून कराच्या स्वरूपात शासनाकडे पैसा जमा होत असतोच.
आपण कर भरता का?
ऑटोरिक्षा व्यवसायाच्या माध्यमातून दररोज शासनाला कर अदा होत आहे. ऑटोरिक्षा खरेदीतून त्याचप्रमाणे दररोेज पेट्रोल खरेदीतून शासनाच्या तिजोरीत कर जमा करतो. त्यामुळे महिन्याकाठी जेवढी कमाई होते, त्यातील काही हिस्सा शासनाला कराच्या स्वरुपात देत असल्याचे ऑटोरिक्षा चालक शिवाजी आवाड यांनी सांगितले.
कर लागतो, हेच माहीत नाही
भाजीविक्री करून घर चालवितो. त्यामुळे घर चालविण्यासाठीच पुरेसा पैसा नाही. त्यामुळे शासनाचा कर भरण्याचा प्रश्नच नाही, असे भाजीविक्रेते डशरथ डुबे यांनी सांगितले.
मोलमजुरी करुन कसाबसा संसार कुटुंब चालविते. घरखर्चासाठीच पैसे कमी पडतात. अशा वेळी शासनाचा कर भरण्याचा प्रश्नच नाही, असे असे घरकामगार द्रौपदी शिंदे यांनी सांगितले.
शासनाकडून वेगवेगळ्या माध्यमांतून कर घेतला जातो. ज्यात वस्तू आणि सेवा कर, आयकर, व्हॅट, व्यवसाय कर या करांव्यतिरिक्त नगरपालिका, ग्रामपंचायतींचे त्यांच्या सेवांवर कर असतात. त्यामुळे व्यावसायिक तसेच कराच्या कक्षेत असलेले नागरिक हा कर अदा करतात. तर सर्वसामान्य नागरिकांकडून वस्तू आणि सेवा कराच्या माध्यमातून तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या माध्यमातून शासनाकडे कर जमा होतो.
राजकुमार भांबरे, कर सल्लागार