येथील जिल्हा परिषद सभागृहामध्ये मावळते मुख्य कार्यकारी अधिकारी बी.पी. पृथ्वीराज यांना निरोप आणि नूतन मुख्य कार्यकारी अधिकारी शिवानंद टाकसाळे यांच्या स्वागताचा कार्यक़्रम पार पडला. यावेळी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा निर्मलाबाई विटेकर, उपाध्यक्ष अजय चौधरी, समाज कल्याण सभापती रामराव उबाळे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी विजय मुळीक, उपमुख्य कार्यकारी अधिकारी मंजुषा कापसे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र तूबाकले यांच्यासह पदाधिकारी, सर्व विभाग प्रमुख, अधिकारी आणि कर्मचारी यांची उपस्थिती होती.
परभणी जिल्हा परिषदेत नव्याने रूजू झालेले मुख्य कार्यकारी अधिकारी शिवानंद टाकसाळे यांनी स्वागतपर मनोगत व्यक्त केले. ते म्हणाले, आपण जिल्ह्यातील समाजमन ओळखून, जिल्हा परिषदेतील कर्मचाऱ्यांना कुटुंबातील सदस्य समजून तसेच परभणी जिल्ह्याला अधिक सक्षम करण्यासाठी रूपरेषा आखून कामकाज करणार आहोत. शिवानंद टाकसाळे यांनी यापूर्वी नांदेड येथे उपजिल्हाधिकारी तसेच नागपूर येथील आदिवासी विकास विभागात अतिरिक्त आयुक्त या पदावर सेवा बजावलेली आहे. यावेळी बोलताना मावळे मुख्य कार्यकारी अधिकारी बी.पी. पृथ्वीराज म्हणाले, जिल्ह्यामध्ये घन वृक्ष लागवड मोहीम, शालेय विद्यार्थ्यांसाठी विविध उपक्रम, स्वच्छ भारत मिशन अंतर्गत विविध स्वच्छता मोहीम अशा अनेक विभागाअंतर्गत अभिनव उपक्रम राबविताना जिल्हा परिषदेतील पदाधिकारी, अधिकारी आणि कर्मचारी यांचे चांगले योगदान मिळाले. याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले.