मागील वर्षी कोरोनाच्या संसर्गामुळे पोलीस दलात बदल्या झाल्या नाहीत. त्या आता यावर्षी होतील, अशी आशा आहे. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक पद मागच्या काही महिन्यांपासून रिक्त आहे. त्यामुळे या शाखेत निरीक्षक पद मिळविण्यासाठी काही जणांनी प्रयत्न सुरू केले आहेत. पोलीस दलात पाच वर्षांनंतर अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या बदल्या केल्या जातात. मंगळवारीच अधीक्षकांनी १३ कर्मचाऱ्यांच्या पोलीस मुख्यालयात बदल्यांचे आदेश काढले आहेत. अधिकाऱ्यांच्या बदल्याही होणार असल्याने चांगले ठाणे मिळविण्यासाठी अनेकांनी फिल्डिंग लावली आहे.
या तीन ठाण्यांना पसंती
नानलपेठ : परभणी शहरातील महत्त्वाचे पोलीस ठाणे. या ठाण्यांतर्गत मार्गांवरून वाळू वाहतूक, वीटभट्ट्यांची संख्या अधिक आहे. मराठवाडा प्लॉट, वांगी रोड, पाथरी रोड भागाचा समावेश असल्याने कामास मोठा वाव.
कोतवाली : या ठाण्यांतर्गत अवैध धंदे मोठ्या प्रमाणात चालतात. शिवाय राष्ट्रीय एकात्मतेचे प्रतीक असलेला उरुसाचे स्थळ याच ठाण्यांतर्गत येते. त्यामुळे अनेकांना हे ठाणे हवे असते.
गंगाखेड : या ठाण्यांतर्गत अवैध वाळू वाहतुकीचे प्रमाण अधिक आहे. शिवाय इतर अवैध धंद्यांची संख्या अधिक आहे. त्यामुळे या ठाण्यात काम करण्यास अधिकाऱ्यांना मोठा वाव असतो.
या ठाण्यात नको रे बाबा !
नवा मोंढा : जिल्हाधिकारी कार्यालयासह इतर शासकीय कार्यालये ठाण्यांतर्गत येतात. त्यामुळे मंत्र्यांचे दौरे, सतत होणारी आंदोलने यामुळे कायम बंदोबस्त देण्याची जबाबदारी ठाण्याच्या प्रभारींवर असते.
जिंतूर : गुन्हेगारीचे प्रमाण अधिक आहे. शिवाय तेवढाच राजकीय हस्तक्षेप वाढलेला असतो. त्यामुळे कायम वादाची प्रकरणे घडतात. काम करताना नेहमीच दबाव वाढलेला असतो.
पिंपळदरी : जिल्ह्याच्या ठिकाणापासून दूर अंतरावर आहे. ठाण्यांतर्गत गावांची संख्याही कमी आहे. छोटे ठाणे असल्याने काम करण्यास अधिक वाव नाही. परिणामी हे ठाणे घेण्यास अनेक जण उदासीनता दाखवितात.
स्थानिक गुन्हे शाखा
पोलीस अधीक्षकांच्या अखत्यारीत असलेली विशेष शाखा म्हणून स्थानिक गुन्हे शाखेकडे पाहिले जाते. या शाखेतील पोलीस अधिकाऱ्याला विशेष महत्त्व असते. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक प्रवीण मोरे यांच्या बदलीनंतर या शाखेला कायमस्वरूपी अधिकारी मिळालेला नाही. हे पद मागील सहा-सात महिन्यांपासून रिक्त आहे. त्यामुळे या पदासाठीही अनेकांनी प्रयत्न सुरू केले आहेत.