परभणी: जुन्या नाण्याच्या मोबदल्यात ५० लाख रुपये देण्यात येतील, असे एका भामट्याने आश्वासन दिल्याने त्याला भुलून त्याच्या बँक खात्यावर १६ हजार ९५० रुपये भरलेल्या महिलेची फसवणूक झाल्याचा प्रकार परभणी शहरात घडला आहे. याप्रकरणी अज्ञात चोरट्याविरुद्ध नानलपेठ पोलीस ठाण्यात शनिवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी, परभणी शहरातील धार रोड भागातील समद प्लॉट भागातील राहिवासी असलेल्या सालेहा बानो स. अब्दुल मुकीत याचे पती स. अब्दुल मुकीद यांच्या मोबाईलवर ८ डिसेंबर रोजी सायंकाळी ६.२४ वाजता ७६०३०७०५६१ क्रमांकाच्या मोबाईलवरून एका व्यक्तीने फोन केला. त्यात आपण ओल्ड क्वाईन कंपनी, मुंबई येथून बोलत आहे. तुमच्याकडे जुने कोणतेही शिक्के असतील तर मी प्रत्येक शिक्क्याला आमच्या कंपनीकडून प्रतिसिक्का २५ लाख रुपये देतो, असे सांगितले. त्यानंतर सालेहा बानो याची आपल्याकडे २ शिक्के असल्याचे सांगितले. तेव्हा समोरील व्यक्तीने या शिक्क्याचे फोटो काढून ९५०७८१४९५१ क्रमांकाच्या व्हाॅट्सॲपवर पाठवा, असे सांगितले. त्यानुसार त्यांनी हे फोटो पाठवले. त्यानंतर समोरील व्यक्तीने तुम्हाला २ प्रमाणपत्र घ्यावे लागतील असे सांगितले. त्यासाठी एअरटेल पेमेंट बँकेच्या खात्यावर अभिषेक कुमार नावाने ४ हजार १५० रुपये पाठवण्यास सांगितले.
ते त्यांनी लालचीतून पाठविले. त्यानंतर जीएसटीसाठी आणखी १२ हजार ८०० रुपये पाठवावे, असे सांगितले. त्यांनी तेही पाठविले. त्यानंतर त्याने त्यांच्या व्हाॅट्सॲपवर २ प्रमाणपत्र पाठविले. त्यामुळे सालेहा बानो यांनी आपणास आपले ५० लाख कधी मिळतील, असे विचारले असता पुन्हा समोरील व्यक्तीने आणखी ११ हजार रुपये पाठवा, असे सांगितले. त्यानंतर त्यांना समोरील व्यक्ती आपली फसवणूक करीत आहे, असे वाटले. त्यामुळे त्यांनी संबंधित खात्यावर पैसे पाठविले नाहीत. त्यानंतर त्यांनी नातेवाईकांच्या मदतीने सदरील क्वाईन कंपनीची मुंबई येथे चौकशी केली असता, अशी कोणतीही कंपनी मुंबईत अस्तित्वात नसल्याचे समजले. याबाबत १६ हजार ९५० रुपयांची फसवणूक झाल्याची बाब त्यांच्या लक्षात आल्याने सालेहा बानो यानी नानलपेठ पोलीस ठाण्यात १९ डिसेंबर रोजी फिर्याद दिली. त्यावरून पोलिसांनी अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास पोलीस करीत आहेत.
फसवणूक वाढलीऑनलाईनच्या माध्यमातून सर्वसामान्य नागरिकांची फसवणूक करण्याचे प्रकार गेल्या काही दिवसांमध्ये वाढले आहेत. अशा घटनांना आळा घालण्यात सायबर पोलिसांना अपयश येत आहे.