परभणी- शहरातील नवीन पाणीपुरवठा योजनेच्या नळ जोडणी दराविरोधात गुरुवारी सकाळी ११.३० वाजेच्या सुमारास महिलांनी तोंडाला काळी पट्टी बांधून महानगरपालिकसमोर आंदोलन केले.
महानगरपालिकेने नवीन नळ जोडणीसाठी प्रत्येक नळ जोडणीधारकास ११ हजार रूपयांचा दर आकारण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाला नागरिकांचा मोठ्या प्रमाणात विरोध सुरु आहे. या अनुषंगाने गुरुवारी सकाळी ११.३० वाजेच्य सुमारास शहरातील वॉर्ड क्रमांक १५ मधील विश्वनाथ गृहनिर्माण संस्थेतील महिला मोठ्या संख्येने महानगरपालिकेसमोर जमल्या. यावेळी त्यांनी तोंडाला पट्टी बांधून मनपाच्या नवीन दरवाढीचा निषेध नोंदविला.
वॉर्ड क्रमांक १५ मध्ये निवडून दिलेले नगरसेवक नवीन दरवाढीबाबत मूग गिळून गप्प बसले आहेत. त्यामुळे तोंडावर काळी पट्टी बांधून मनपासमोर आंदोलनकरण्याचा निर्णय घेतला असल्याचे या महिलांनी यावेळी सांगितले. काही वेळ आंदोलन केल्यानंतर या संदर्भातील निवेदन मनपा प्रशासनास महिलांच्या शिष्टमंडळाने दिले. या आंदोलनात ज्योती गायकवाड, मीनाक्षी विभूते, कौशल्य म्हेत्रे, आरती म्हेत्रे, ज्योती अंकुशकर, व्यंकटबाई चेलनवाड, सुनिता कदम, आशा कुलकर्णी, विश्रांती रेंगे, सखुबाई आवचार, अरुणा पांचाळ, आशा कदम, शीतल कलाप्पा आदी महिलांसह नागरिकांनी मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदविला.