खादगाव येथे अवैध दारू विक्री मोठ्या प्रमाणात होत आहे. बाहेरगावातील ४ ते ५ जण गावात येऊन दारू विक्री करतात. त्यामुळे गावात दारू सहज उपलब्ध होत आहे. दारू विक्री करण्यासाठी फोनच्या माध्यमातून संपर्क केला जातो. शेतशिवारात बोलावून दारूचा पुरवठा केली जात आहे. त्यामुळे गावातील अनेक तरुण दारूच्या आहारी गेले आहेत. सामाजिक व घरगुती हिंसाचार वाढले असून, मुलांच्या शिक्षणावरही परिणाम होत असल्याची कैफियत या महिलांनी पोलीस अधीक्षक आणि राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पोलीस निरीक्षकांकडे मांडली.
तेव्हा गावात होणारी अवैध दारू विक्री बंद करून या संकटातून आम्हाला सोडवावी, अशी मागणीही या महिलांनी केली आहे. खादगाव ग्रामपंचायतीच्या सरपंच सावित्री फड यांच्यासह गयाबाई शिंदे, सुदामती फड, गीता फड, मंदोदरी फड, आशा फड आदी ३० ते ४० महिलांनी पोलीस अधीक्षक तसेच राज्य उत्पादन शुल्क विभागाचा पोलीस निरीक्षकांची भेट घेऊन दारूबंदीची साकडे त्यांना घातले.
पोलीस कर्मचाऱ्यांचा सहभाग
गावात अवैध दारू विक्री होत असताना पोलिसांकडून कारवाई होत नाही त्यामुळे यात पोलीस कर्मचाऱ्यांचाही सहभाग असल्याचा आरोप महिलांनी केला. त्यावर अधिकाऱ्यांनी लवकरच गावात भेट देऊन दारूविक्री बंद केली जाईल, अशी ग्वाही दिली.