मानवत ( परभणी ) : तालुक्यातील कोथळा येथील महिला गावातील अवैध दारू विक्रीविरुद्ध आक्रमक झाल्या आहेत. गावातील अवैध दारू बंद करण्याच्या मागणीसाठी महिलांसह गावातील शेकडो नागरिकांनी आज दुपारी 12:30 वाजता मानवत पोलीस ठाणे गाठले. अवैध दारू विक्रेत्यांचा तत्काळ बंदोबस्त करावा अशी मागणी पोलीस निरीक्षक सुभाष राठोड यांच्याकडे महिलांनी केली.
मानवत तालुक्यातील कोथळा गावातील सात ते आठ जण मागील अनेक दिवसांपासून रोज सर्रास अवैध दारू विकत आहेत. लहान मुलानांही दारूचे व्यसन लागले आहे. मद्यपींचा त्रास गावातील महिलांना वाढला आहे. रोजमजुरीसाठी घराबाहेर पडणार्या महिलांना मद्यपींच्या अर्वाच्च व बेताल वागण्याचा मानसिक त्रास सोसावा लागत आहे. गावातील गोरगरीब कुटुंबाला अवैद्य दारूमुळे आर्थिक फटका बसत आहे. अवैध दारू विक्रेत्यांना याबाबत अनेकदा समज देऊनही उपयोग होत नसून त्यांची अरेरावी वाढत गेली आहे.
यामुळे संतप्त महिलांनी गावातील शेकडो ग्रामस्थांसह पोलीस स्टेशन गाठून गावातील सुरू असलेल्या प्रकाराबाबत माहिती दिली.तसेच गावातील अवैध दारू विक्री कायमची बंद करावी अशी मागणी निवेदनाद्वारे केली. या निवेदनावर सरपंच सुनील पाते, माधवराव निर्वळ, शकुंतला पाते, विमल टापरे, सुनिता बर्वे, मंदोदरी काटे, सुमन सौदागर, छाया काटे, सरस्वती दुगाने, निताबाई दुगाने, वनारसी लांडगे, अनुसया मोगरे यांच्यासह शेकडो महिला आणि ग्रामस्थांच्या सह्या आहेत. पोलीस निरीक्षक सुभाष राठोड यांनी निवेदन स्वीकारले.