पाथरी ( परभणी ), दि. १३ : बंद पडलेली मनरेगाची कामे सुरू करावी, मजुरांना जॉब कार्डचे वाटप करावे या मागणीसाठी दहा गावातील महिला मजुरांनी आज सकाळी पंचायत समिती कार्यालयात ठिय्या आंदोलन केले. महाराष्ट्र राज्य शेतमजूर आणि लाल बावटाच्यावतीने झालेले हे आंदोलन तब्बल तीन तास चाले.
पाथरी तालुक्यात सध्या मनरेगा अंतर्गत कोणतीही कामे सुरू नाहीत. यामुळे मजुरांकडून गेल्या काही दिवसांपासून कामे सुरू करण्याची मागणी केली जात होती. यामुळे मजुरांचे जॉब कार्ड वाटप करावे या मागणीसाठीं महाराष्ट्र राज्य शेतकरी युनियनच्यावतीने मजुरांनी काही दिवसांपूर्वी तहसील कार्यालय वर मोर्चा ही काढण्यात आला होता. मात्र, प्रशासनाने याची दखल घेतली नाही. यामुळे आज पंचायत समितीच्या दालनात महिलांनी ठिय्या आंदोलन केले.
यात गोपेगाव, मरडसगाव, पथरगव्हाण (बु), पथरगव्हण (खु),पाटोदा, कासापुरी, वडी, लोणी तांडा, श्रीरामपूर वस्ती, तुरा या गावातील महिला व पुरुष मजूर सहभागी झाले होते. कविता आव्हाड, काशीबाई भगत यांच्यासह आंदोलनात भरत गायकवाड, भगवान राठोड, सुदाम आगळे, नंद किशोर डवले, गंगाधर आव्हाड, गणेश निसरगंध, मारोती भाग्यवंत आदींचा समावेश होता.