परभणी : बाजारपेठेतील मागणी लक्षात घेऊन महिलांनी शेतीसह जोडधंद्याचे उत्पादन घ्यावे, असे आवाहन डॉ. इरफाना सिद्दिकी यांनी केले.
येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील सामुदायिक विज्ञान महाविद्यालय आणि ग्रामपंचायत कार्यालय माखणी यांच्या वतीने माखणी येथे शेतकरी कुटुंबीयांचे सक्षमीकरण या विषयावर कार्यशाळा घेण्यात आली. याप्रसंगी सिद्दिकी बोलत होत्या.
कार्यशाळेस प्रतापराव काळे, सरपंच गोविंदराव आवरगंड, इरफाना सिद्दिकी, डॉ.जयश्री रोडगे, फरजाना फारूखी, प्रा. नीता गायकवाड व डॉ. शंकर पुरी आदींची प्रमुख उपस्थिती होती. इरफान सिद्दिकी म्हणाल्या, कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी सध्या बाजारपेठांमध्ये मास्कला मोठी मागणी आहे. अर्थार्जनाचे दृष्टीने व सर्वसामान्यांना वापरण्यासाठी सुविधा होईल अशा पद्धतीचे विविध मास्क तयार करण्याचे प्रात्यक्षिकही त्यांनी यावेळी दिले. डॉ.जयश्री रोडगे यांनी शेती कामांमध्ये महिलांचे श्रम व बचतीचे साधने व घरातील स्वच्छतेचे व्यवस्थापन याविषयी माहिती दिली. तर फरजाना फारुकी यांनी प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी योग्य आहार आणि प्रक्रिया उद्योग विषयी माहिती दिली. कार्यक्रमात प्रा. नीता गायकवाड, प्रतापराव काळे, सरपंच गोविंदराव आवरगंड यांनीही मार्गदर्शन केले.
परिसरातील लाभार्थ्यांना मानव विकास घडी पत्रिका व पुस्तिकांचे वाटप करण्यात आले. तर डॉ. शंकर पुरी यांनी प्रास्ताविक केले. माधवराव आवरगंड यांनी सूत्रसंचालन केले. संशोधक सहायक शीतल मोरे यांनी आभार मानले. प्राचार्य जया बंगाळे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ संशोधक डॉ. शंकर पुरी यांनी या कार्यशाळेचे आयोजन केले होते.