वालूर : सेलू तालुक्यातील वालूर येथे प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत बुधवारी ग्रामस्थांना लसीकरण देण्यात येणार होते. यासाठी गावातील महिलांनी सकाळपासूनच या केंद्रासमोर रांग लावली होती. मात्र या केंद्राच्या नियोजनाअभावी या महिलांना जवळपास ४ तास ताटकळत लस घेण्यासाठी वाट पाहावी लागल्याचा प्रकार बुधवारी समोर आला.
सेलू तालुक्यातील सर्वात मोठे गाव म्हणून वालूरकडे पाहिले जाते. या ठिकाणी आरोग्य विभागाच्या वतीने प्राथमिक आरोग्य केंद्राची उभारणी करण्यात आली. या अंतर्गत ५४ गावांतील रुग्णांसाठी सेवा देण्याचे काम केले जाते. कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर लसीकरणासाठी नागरिकांनी पुढे यावे, यासाठी कोट्यवधी रुपयांचा खर्च जिल्हा प्रशासनाकडून करून जनजागृती करण्यात येत आहे. पहिल्या व दुसऱ्या लाटेची तीव्रता पाहून ग्रामीण भागात सप्टेंबर महिन्यापासून ग्रामीण भागात नागरिक कोरोनाच्या लसीकरणासाठी पुढे येत आहेत. वालूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत १५ सप्टेंबर रोजी गावातील ग्रामस्थांना लसीकरण करण्याचे नियोजन करण्यात आले होते. मात्र लसीकरणाच्या ऑनलाईन प्रणालीत बिघाड व या केंद्रातील अधिकारी व कर्मचाऱ्यांमधील असलेल्या असमन्वयामुळे गावातील महिलांना चार तास या केंद्रासमोर लसीकरणासाठी ताटकळत बसावे लागल्याने महिलांमधून या केंद्राच्या कारभाराविरुद्ध संताप व्यक्त होत आहे.