वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या २०२०-२१ या सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त विद्यापीठ स्थापनेपासूनच्या सर्व माजी विद्यार्थ्यांचे सदस्य नोंदणी अभियान सुरू करण्यात आले आहे. या कार्यक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी डॉ. ढवण बोलत होते. कार्यक्रमास विद्यापीठाचे माजी विद्यार्थी तथा अतिरिक्त जिल्हाधिकारी राजेश काटकर, मनपा आयुक्त देवीदास पवार, स्टेट बँक ऑफ इंडियाचे व्यवस्थापक शिवराम खेडुळकर, शिक्षण संचालक डॉ. धर्मराज गोखले, कुलसचिव डॉ. धीरज कदम, प्राचार्य डॉ. सय्यद इस्माईल, प्राचार्य भगवान आसेवार, प्राचार्य डॉ. उदय खोडके, प्राचार्य डॉ. जया बंगाळे आदींची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमात कुलगुरू डॉ. अशोक ढवण यांनी सर्वप्रथम सदस्य नोंदणी केली. अतिरिक्त जिल्हाधिकारी राजेश काटकर म्हणाले, प्रशासकीय पदावर काम करीत असताना शेतकरी बांधवांसाठी काम करण्याची संधी या विद्यापीठाने दिली. विद्यापीठातील काही जमीन कृषी उद्योजकांना फुट पार्क उभारणीकरिता दिल्यास शेतकरी व कृषी उद्योजकांचा फायदा होऊ शकेल. विद्यापीठ राबवित असलेल्या हरित विद्यापीठ उपक्रमासही अनेकांचे मदतीचे हात पुढे येत आहेत. या उपक्रमाप्रमाणेच इतर अनेक चांगले उपक्रम राबविण्यासाठी माजी विद्यार्थी पुढे येतील, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला. डॉ. धर्मराज गोखले यांनी प्रास्ताविक केले. डॉ. रणजीत चव्हाण यांनी सूत्रसंचालन केले. डॉ. सुरेश वाईकर यांनी आभार मानले. कार्यक्रमास विद्यापीठातील विविध विभागांचे विभागप्रमुख, प्राध्यापक, अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
माजी विद्यार्थ्यांच्या माध्यमातून घडेल समाज उभारणीचे कार्य
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 09, 2021 4:13 AM